मुंबई: आपलं दुकान, ज्यावर तुम्हाला मिळेल हवं ते सर्व सामान, अशी अॅमेझॉनची जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. मात्र एका तरुणीला तिला हवी असलेली गोष्ट अॅमेझॉनवर सापडलीच नाही. त्या तरुणीनं याबद्दलची तक्रार अॅमेझॉनकडे केली. या तरुणीची मागणी अतिशय हटके होती आणि अॅमेझॉननं त्या तरुणीला तितकंच हटके उत्तर दिलं. सध्या या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर अगदी जोरात सुरू आहे. अदिती नावाच्या एका तरुणीनं ट्विट करुन त्यामध्ये अॅमेझॉनला मेन्शन केलं. 'अॅमेझॉन स्वत:ला जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट म्हणवतं. मात्र माझी गरज पूर्ण करणारी गोष्ट इथे मिळतच नाहीय,' असं अदितीनं ट्विटमध्ये म्हटलं. यामुळे अॅमेझॉनची सोशल मीडिया टीमदेखील थोडी विचारात पडली. त्यांनी लगेच अदितीला रिप्लाय केला. 'आम्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आमच्या वेबसाईटवरील उत्पादनं वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला नेमकं काय हवंय, हे आम्हाला सांगाल का?,' असा रिप्लाय कंपनीच्या सोशल मीडिया टीमनं दिला.