अधिक सुंदर दिसण्याची इच्छा एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नुकसान करण्यासाठी भाग पाडते. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका मुलीने सुंदर दिसण्यासाठी आतापर्यंत तब्बल 100 पेक्षा जास्त प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. यावर तिने 563,000 डॉलर म्हणजेच सुमारे 4.66 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून तिच्यावर सर्जरी सुरू आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर लोकांना धक्का बसला आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील रहिवासी झोउ चुना नावाच्या या मुलीला वयाच्या तेराव्या वर्षापासून प्लास्टिक सर्जरीचं वेड आहे. तिला तिची आवडती अभिनेत्री एसथल यू सारखं सुंदर दिसायचं आहे. यासोबतच ती प्रसिद्ध होण्याचं स्वप्नही पाहते. तिच्या सर्जरीचा संपूर्ण खर्च तिच्या पालकांनी उचलला आहे. शाळेच्या दिवसांपासून तिला तिच्या लूकबद्दल खूप काळजी वाटत होती. जेव्हा लोकांनी तिला सांगितलं की ती तिच्या आईसारखी सुंदर नाही, तेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागले.
झोउने शांघायच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकण्यास सुरुवात केली. इथे तिच्या वर्गात शिकणारी मुलं तिच्यापेक्षा जास्त सुंदर आणि आत्मविश्वास असलेली असल्याचं तिला जाणवू लागलं. यामुळे तिला त्या मुलांचा हेवा वाटू लागला. यानंतर तिने तिचा लूक बदलण्यास सुरुवात केली. जेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती, तेव्हा तिच्या आईने पहिलं ऑपरेशन करण्यासाठी परमिशन दिली. प्लास्टिक सर्जरीसाठी तिने शाळाही सोडली.
डॉक्टरांनी तिला ताकीदही दिली आहे की तिचे डोळे तिला आणखी मोठे करता येणार नाहीत कारण 10 प्रोसेजर आधीच केल्या गेल्या आहेत. पण या इशाऱ्याकडेही ती दुर्लक्ष करत आहे. सर्वात वेदनादायक शस्त्रक्रिया म्हणजे बोन शेविंग होती. जी 10 तास चालली. तेव्हा झोऊ फक्त 15 वर्षांची होती. सोशल मीडियावर लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. ते म्हणतात की,एखाद्या व्यक्तीने स्वतःवर प्रेम करावं पण अशा प्रकारे करू नये.