देहरादून: फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून जमलेल्या प्रेम प्रकरणांची कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पबजी खेळता खेळता अनेकांचं सूत जुळलं, हेदेखील तुमच्या वाचनात आलं असेल. पण उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये एक अजब घटना घडली आहे. एक तरुणी पबजी खेळता खेळता दोन तरुणांच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिनं दोन्ही तरुणांना एकाचवेळी भेटायलादेखील बोलावलं.
उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये राहणाऱ्या तरुणीला पबजी गेमची आवड होती. ती ऑनलाईन पबजी खेळायची. जवळपास दोन वर्षांपूर्वी पबजी खेळता खेळता तिची ओळख राजस्थानातल्या एका तरुणाशी झाली. त्यानंतर दोघांनी आपापले नंबर एकमेकांना दिले. मग दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.
धक्कादायक बाब म्हणजे, महिन्याभरापूर्वी याच तरुणीचं उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमधील एका तरुणासोबतही सूत जुळलं. विशेष म्हणजे या मुलाशीदेखील तिची ओळख पबजी खेळता खेळताच झाली. यानंतर तरुणीनं दोन्ही तरुणांना हल्द्वानीमध्ये भेटायला बोलावलं. दोन्ही तरुण समोरासमोर आले आणि तरुणी आपली प्रेयसी असल्याचा दावा करू लागले. त्यानंतर दोघेही भिडले आणि एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शांतता भंग केल्यानं दोघांविरोधात कारवाई झाली. तरुणी एकाचवेळी दोन्ही तरुणांसोबत प्रेमाचा गेम खेळत असल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं. दोन्ही तरुण अतिशय उत्तम पबजी खेळायचे. त्यांच्या गेमिंग कौशल्यावर तरुणी भाळली आणि तिनं दोघांसोबत प्रेमाचा गेम केला. मात्र तरुणीनं दोघांना एकाचवेळी भेटायला का बोलावलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.