जगभरात अनेक अजब-गजब घटना या नेहमीच आपण ऐकत असतो. अशीच एक विचित्र घटना आता समोर आली आहे. डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णाला रडू आलं म्हणून तिच्याकडून जवळपास 3 हजार रुपये वसूल केल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या बहिणीने ट्विटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. एका यूट्यूबरने दिलेल्या माहितीनुसार, "emotional and behavioural assessment" नावाने त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले आहेत.
न्यूयॉर्कमध्ये राहणारी यूट्यूबर केमिली जॉनसनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून घडलेल्या अजब प्रकाराची माहिती दिली आहे. तिची बहीण एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. तिने हॉस्पिटलचं बिल शेअर केलं आहे. यामध्ये एका हेल्थ कंडीशनमुळे माझी लहान बहीण खूप त्रस्त आहे. त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर त्यांनी रडली म्हणून माझ्या बहिणीकडून तीन हजार रुपये घेतले असं म्हटलं आहे.
"माझी बहीण इमोशनल झाली कारण ती फ्रस्ट्रेटेड आणि हेल्पलेस फील करत होती. अश्रूचा एक थेंब पडला म्हणून तीन हजार घेतले. पण ती नेमकं का रडतेय हे विचारलं देखील नाही. तसेच तिची मदत केली नाही. प्रिसक्रिप्शन देखील दिलं नाही" असंही केमिलीने म्हटलं आहे. केमिलीच्या या पोस्टनंतर हजारो लोकांनी आपला अनुभव शेअर करत भन्नाट किस्से सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.