सिडनी : एका छोट्या मुलीच्या आई व बाबांना आपण दोघेच सायंकाळी बाहेर जेवायला जाऊ, सिनेमा बघू व मौज करू, असे वाटले. परंतु पैशांची तर तीव्र टंचाई. त्यांना एवढा खर्च करता येणार नव्हता. आई-बाबांचे हे बोलणे त्यांची दहा वर्षांची चेल्सी-ली ओर्दोनीझ डी क्रॉस हिने ऐकले. तिने स्वत: ची पिग्गी बँक (गल्ला) फोडली व जमलेली ८२ डॉलरची बचत सगळीच्या सगळी आई आणि बाबांना रात्रीचे जेवण व सिनेमा बघण्यासाठी भेट दिली. तिने त्यांच्या संपूर्ण रात्रीच्या कार्यक्रमाचा जणू खर्चच उचलला. चेल्सीने आई व वडिलांना उद्देशून छोटे पत्र लिहिले.‘‘प्रिय आई आणि बाबा, तुमच्या कार्यक्रमासाठी हे काही पैसे. या पैशांतून सिनेमा, डिनर आणि आणखी काही खर्च भागू शकेल. ताजा कलम : आपण आताच बघितलेल्या भीतीदायक ट्रेलरचा सिनेमा तुम्ही पाहू शकता. तुमची लाडकी चेल्सी-ली’’ पालक भारावले चेल्सीची आई मार्सी ओर्दोनीज (३१) म्हणाली की तिच्या लाडक्या मुलीच्या वागण्यामुळे मी अतिशय भारावून गेले आहे. तिच्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. तिच्या उदारतेने मी पूर्णपणे भारावून गेले असून तिच्या नि :स्वार्थीपणाचा मला मोठा अभिमान आहे. चेल्सीचे हृदय सुंदर असून तिच्या वयाच्या पलीकडे जाणारी तिची कृती आहे. चेल्सीचा स्वभाव सुंदर असल्याचेही मार्सी म्हणाल्या.चेल्सीने सिडनीच्या नॉर्थ शोअर येथील सेंट लुसी या शाळेत शिकताना अडचणी येणाऱ्या मुलांसाठी निधी गोळा करायला सुरवात केली आहे.
आई-बाबांच्या स्वप्नासाठी मुलीने फोडली पिग्गी बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 1:00 AM