बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोकांचं योग्य आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. अशात त्यांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागत आहे. भारतात ही समस्या इतकी वाढली आहे की, १० पैकी ६ लोकांचं वजन वाढत आहे. मुलींना झिरो फिगर हवं असतं. त्यामुळे स्लिम दिसण्यासाठी त्या तासंतास जिममध्ये मेहनत घेताना दिसतात. पण एक असाही देश आहे जिथे तरुणींना स्लिम नाही तर जाड व्हायचं आहे. इतकंच नाही तर यासाठी त्या वाट्टेल ते करतात.
१६००० कॅलरी घेण्याची वेळ
तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, आफ्रिकेतील मॉरीटेनियामध्ये मुलींना जाड करण्यासाठी १६००० पर्यंत कॅलरी डाएटमध्ये घेण्यास जबरदस्ती केली जाते. या संदर्भात एक माहितीपटही समोर आला आहे. यामागचं कारण म्हणजे इथे मुलांच्या जाडेपणावरुन त्यांचं सौंदर्य मोजलं जातं. त्यामुळे येथील महिलांना जाड होण्यासाठी अमानवीय गोष्टींचाही सामना करावा लागतो.
फिडींग सीझन
इथे दोन महिन्यांचा 'फीडिंग सीझन' असतो. यादरम्यान ११ वर्षावरच्या मुलींना जाड करण्यासाठी उंटाची दूध, खिचडी अशा गोष्टींचं सेवन करायला सांगितलं जातं. जेणेकरुन त्यांचं वजन वाढावं आणि त्या पुरुषांसाठी आकर्षण ठराव्या. मुलींच्या आई मुलींना खाण्यासाठी जबरदस्ती करतात. कधी कधी तर खाताना त्यांच्या पोटातही दुखतं, त्यांना उलट्या होऊ लागतात, तरीही त्यांना खाण्यास जबरदस्ती केली जाते.
जनावरांचं केमिकल मुलींना
गरीब लोक खाद्य पदार्थांची कमतरता असल्याने मुलींना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यास सांगतात. मुलींना जनावरांना जाड करण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल सेवन करण्यास जबरदस्ती केली जाते. इतकेच नाही तर घरात जास्त अन्न नसतं, तेव्हा घरातील दुसरे सदस्य उपाशी राहतात आणि मुलींना खायला देतात. याने त्यांना डायबिटीज, हार्ट फेल आणि किडनी फेल अशा आजारांचा धोका वाढतो. या 'सीजन फिडींग'मुळे अनेक मुलींचा मृत्यू झाल्याचही सांगितलं जातं.