पाटणा: बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक अजब घटना घडली आहे. बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास असलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीवर डॉक्टरांनी रविवारी शस्त्रक्रिया केली. त्याच्या पोटातून एक काचेचा ग्लास काढण्यात आला. तो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
काचेचा ग्लास व्यक्तीच्या शरीरात गेलाच कसा, असा प्रश्न डॉक्टरांसह रुग्णाच्या नातेवाईकांना पडला. रुग्ण वैशाली जिल्ह्यातल्या महुआचा रहिवासी असल्याची माहिती शस्त्रक्रियेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या डॉ. मखदुलुल हक यांनी दिली. आतड्यांमध्ये गंभीर स्वरुपाची गडबड असल्याचं अल्ट्रासाऊंड आणि एक्सरेमधून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
ऑपरेशनच्या आधी करण्यात आलेल्या एक्सरेचा फोटो डॉक्टरांनी माध्यमांसोबत शेअर केला. 'काचेचा ग्लास पोटापर्यंत कसा पोहोचला हे रहस्यच आहे. आम्ही याबद्दल रुग्णाकडे विचारणा केली. त्यावर चहा पिताना ग्लास गिळल्याचं त्यानं सांगितलं. पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. कारण माणसाच्या अन्ननलिकेतून ग्लासाइतकी मोठी वस्तू जाऊ शकत नाही,' असं हक म्हणाले.
सुरुवातीला डॉक्टरांनी एंडोस्कोपिच्या माध्यमातून ग्लास मलाशयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. रुग्ण बरा होण्यास वेळ लागेल, असं हक यांनी सांगितलं. काही महिन्यांमध्ये त्याचं पोट ठीक होईल. याबद्दल रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
मानवी शरीराची रचना पाहता ग्लास केवळ एकाच मार्गानं शरीरात जाऊ शकतो. गुदद्वारातून व्यक्तीनं ग्लास शरीरात ढकलला असावा. मात्र रुग्ण ती बाब सांगू इच्छित नसल्याचं आम्हाला वाटत आहे. तो त्याचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही या गोष्टीचा आदर करतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.