समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाण्याचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोक्यात सर्वातआधी गोव्याचं नाव येतं. कारण इथे ते समुद्र किनाऱ्यासोबत इतरही अनेक गोष्टी एन्जॉय करू शकतात. मात्र गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात केला जाणारा कचरा सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.
काही दिवसांपूर्वीच समुद्र किनाऱ्यावर मद्यसेवन करणाऱ्यांना २ हजार रूपयांचा दंड भरावा लागेल, असा नियमही काढण्यात आला आहे. त्यासोबतच कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक आयडियाची कल्पना समोर आणली आहे. इथे एका अशा बारची सुरूवात करण्यात आली आहे, जिथे तुम्हाला १० बीअरच्या बॉटलची झाकणे आणि वापरलेल्या सिगारेटच्या २० बट बदल्यात एक बीअर दिली जाते.
(Image Credit : www.indiatimes.com)
कशासाठी ही सुरूवात?
गोव्यातील या बारचं नाव 'वेस्ट बार' असं आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी मरीन नावाच्या प्रायव्हेट बीच मॅनेजमेंट एजन्सीने वेस्ट बारची सुरूवात केली आहे. गोवापर्यटन मंत्रालयाने गोव्यातील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचं काम या एजन्सीकडे सोपवलं आहे. या मोहिमेची सुरूवात ३० जानेवारीला करण्यात आली आहे. बागा बीचवर झंझीबार शेकमध्ये या वेस्ट बारची सुरूवात करण्यात आली आहे.
(Image Credit : Tera Mera Beach Facebook)
कुणी केली सुरूवात?
दृष्टी मरीनसोबत मिळून ही संकल्पना पुढे आणणारी नोरीन वॅन होल्स्टीन सांगते की, 'लोकांना गोव्यातील दोन गोष्टी आकर्षित करतात. एक म्हणजे बीच आणि दुसरी म्हणजे बार. त्यामुळे पर्यटक ज्या गोष्टींसाठी इथे येतात त्यांना त्या द्या. कचरा जमा करण्या बदल्यात त्यांना मोफत बीअर दिली जाते. याने बीचवर कचरा होत नाही'.
वॅन होल्स्टीन सांगते की, वेस्ट बारची सुरूवात काही वर्षांपूर्वी नेदरलॅंडमध्ये केली होती. त्यानंतर ही संकल्पना जगभरात प्रसिद्ध झाली. ती सांगते की, सिगारेटचे बट, बॉटल्सची झाकणे, प्लास्टिकचे स्ट्रॉ या बदल्यातही लोकांना बीअर मिळणार आहे.