अर्जेंटिनाच्या सॅन लुईस प्रांतात एका बकरीला माणसाच्या चेहऱ्यासारखा चेहरा असलेले पिलू झाले. ही वार्ता पसरताच हे पिलू पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. बकरीची मालकीण ग्लॅडीस ओव्हेइडो यांनी म्हटले की, आपण अशा प्रकारचे बकरीचे पिलू यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. वस्तुत: या बकरीने या आधीही पिलांना जन्म दिला; पण असे पिलू पहिल्यांदाच जन्माला आले. भीतीदायक दिसणारे हे पिलू जगू मात्र शकले नाही.या पिलाचे दात आणि डोळ्याच्या आजूबाजूचा भाग मानवी चेहऱ्यासारखा होता. पिलाचा जन्म झाल्या झाल्या ग्लॅडीस यांनी त्याचा चेहरा पाहिला, तेव्हा त्या हैराण झाल्या. त्याचे सर्व शरीर बकरीसारखेच होते. मात्र, चेहरा तेवढा वेगळा होता. तसेच त्याचे तोंड वाकडे तिकडे होते, त्यामुळे त्याला दूध पिता येत नव्हते. ग्लॅडीस यांनी त्याला चमच्याने दूध पाजण्याचा प्रयत्न केला. तथापि, जन्मानंतर तीन तासांनी त्याचा मृत्यू झाला. मानवी चेहऱ्याचे बकरीचे पिलू जन्मल्याची बातमी आजूबाजूला झपाट्याने पसरली. लोकांनी त्याचे फोटो काढून समाज माध्यमांवर टाकले. पाहता पाहता हे पिलू व्हायरल झाले. विचित्र चेहऱ्यामुळे भीतीदायक दिसणारे हे पिलू आता जगात नाही. मात्र, ते इंटरनेटवर चर्चेचा विषय झाले आहे. त्याचे फोटो समाजमाध्यमांवर जगभरात फिरत आहेत.
आश्चर्यकारक - अर्जेंटिनाच्या सॅन लुईस प्रांतात एका बकरीला झाले मानवी चेहऱ्याचे पिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:48 AM