ठाणे : बिल्डर परमार यांच्या आत्महत्येला जी गोल्डन गँग जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे, तशा गोल्डन गँग प्रत्येक महानगरात आणि नगरात कार्यरत आहेत. या गोल्डन गँगचा शुभारंभ १९७५ व त्या नंतरच्या काळात जेव्हा मुंबई महापालिकेत काँग्रेसेतर पक्षांची सत्ता होती व शिवसेनेचे एक बडे नेते स्थायी समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी घडविला आहे. आपण वरपांगी जनतेचे आणि दालनात स्वार्थाचे राजकारण करावे, अशा दुटप्पी हेतूने अशी गोल्डन गँग या नेत्याने साकारली होती. माध्यमांसमोर, सभागृहात परस्परांना प्रखर विरोध करायचा, अगदी परस्परांचे कपडे काढणारी भूमिका घ्यायची, परंतु मालदार विषयांबाबत प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी खासगीत चर्चा करायची, त्यातून मिळणाऱ्या लाभाचे आपसात वाटप करून घ्यायचे व तो विषय विनासायास मंजूर होऊ द्यायचा. कधी त्यासाठी सभात्याग, कधी बहिष्कार, तटस्थता अथवा अनुपस्थिती, अशी अस्त्रे वापरायची, परंतु अशा विषयांना विरोध करताना मतदानाची मागणी करायची नाही किंवा ते होईल, अशी परिस्थिती आली, तरी विरोधात मतदान करणे टाळायचे, अशी या गँगची स्टाईल होती. पुढे त्यात अधिकारीही सामील करून घेतले गेले. त्यातून कोणतेही मालदार काम विनासायास करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी या गँगच्याच माध्यमातून करण्याची पद्धत रूढ झाली. त्याचे टक्केवारीचे दर आणि त्यातली भागीदारी रेटकार्डासारखी ठरलेली होती. ही गँग सीस्टिम रिझल्ट ओरिएंटेड असल्याने ती झपाट्याने लोकप्रिय झाली. परिणामी, सत्ता कुठल्याही पक्षाची असो, कामे करून देणारी गोल्डन गँग कायम राहिली. फक्त त्यातले सूत्रधार आणि प्यादे बदलत गेले. मुंबई महापालिकेतील तिचे हे यश पाहून सर्वच महापालिका, पालिका एवढेच नव्हे, तरी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही पुढे शासकीय खात्यांतही त्या निर्माण झाल्या. सिंचन घोटाळा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळा किंवा चिक्कीचा घोटाळा हे सगळे घोटाळे अशाच वेगवेगळ्या गोल्डन गँगच्या करणीचीच फळे आहेत. १० जणांना खिरापत वाटत बसण्यापेक्षा गँगच्या लीडरशी एकदाच डील करून मोकळे व्हावे, तो बाकीच्यांना सांभाळून घेतो, हे तंत्र सगळ्यांसाठीच सोईचे होते. याच गँग सीस्टिमने परमारांच्या रूपाने पहिला बळी घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)>>>>>>>>‘त्या कारणाचा’ शोध सुरूपरमार यांच्या आत्महत्येमागे प्रत्यक्षात नेमके कोणते कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. कारण ज्या शासकीय धोरणांवर आणि प्रणालीवर फोडले आहे, तिच्या धोरणे आणि प्रणालीनुसार हजारो बिल्डर आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांची भरभराटही झाली आहे. त्यात कॉर्पोरेट बिल्डरांपासून ते अगदी छोट्या-मोठ्या बिल्डरांचा समावेश आहे. मग या बिल्डर्सना जी धोरणे अडचणीची ठरत नाहीत, तीच धोरणे परमार यांच्यासाठी धोकादायक का ठरली? या दृष्टीने तपासाची सूत्रे हलविली जात आहेत. त्यामुळेच त्याला कारणीभूत असणाऱ्या शासकीय धोरणे आणि यंत्रणा वेगळ्या असाव्यात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत परमार यांच्याशी व त्यांच्या व्यवसायाशी संबंधित जेवढ्या घटना घडल्यात, त्या सगळ्यांची बारकाईने चौकशी सुरू झाली आहे. >>>> राजकीय नेत्यांसह पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखलठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर सोमवारी अज्ञात राजकीय नेते आणि पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मागील आठवड्यात बुधवारी परमार यांनी घोडबंदर येथे आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये राजकीय गोल्डन गँग आणि पालिका अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे, परंतु त्यांची नावे खोडल्याने ही सुसाइड नोट फॉरेन्सिक लॅबकडे तपासण्यासाठी पाठविली आहे. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर सुसाइड नोट आणि आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारावर सोमवारी अज्ञात राजकीय नेते आणि पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात ३०६ अन्वये म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल केले आहेत. आता फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर त्यात ज्या कोणाची नावे पुढे येतील, त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.>>>>>> 5000 बांधकाम व्यावसायिकांचा आज मोर्चा आणि बंदकॉसमॉस ग्रुपचे मालक असलेल्या सूरज परमार यांनी मागील आठवड्यात आत्महत्या केली होती. त्यामुळे शहरातील बिल्डर्सही धास्तावले आहेत. म्हणूनच महापालिका प्रशासनाचा आणि काही राजकारण्यांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी येथील सुमारे पाच हजार बांधकाम व्यावसायिक बंद पाळून मूक मोर्चाही काढणार आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून खारकर आळी ते ठाणे पालिका मुख्यालयावर सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात येईल. परमार यांच्या कुटुंबाला संपूण संरक्षण मिळावे, त्यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये, शिवाय पालिकेत ज्या पद्धतीने एखाद्या प्रकल्पाच्या मंजुरीच्या फाइल सरकत आहेत, त्यामुळे होणारा विलंब पाहता, एक खिडकी योजना अमलात आणावी, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे, तसेच बंदमुळे मंगळवारी संपूर्ण बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये आणि बांधकाम साइट्स बंद राहणार आहेत.
गोल्डन गँग ही शिवसेनेची ‘देणगी’
By admin | Published: October 13, 2015 3:44 AM