'गोल्डन टेंपल' नाव ऐकताच कुणाच्याही डोळ्यासमोर अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची प्रतिमा दिसते. आपल्या भव्यतेसाठी आणि सुंदरतेसाठी हे सुवर्ण मंदिर जगभरात लोकप्रिय आहे. पण तुम्ही जर विचार करत असाल की, भारतात केवळ हे एकच सुवर्ण मंदिर आहे तर तुम्ही चुकताय. कारण भारतात आणखी एक असं मंदिर आहे जे सोन्याने तयार करण्यात आलंय. हे मंदिर पाहिल्यावर काही वेळांसाठी तुम्ही थक्क व्हाल.
भारतातील हे दुसरं सुवर्ण मंदिर दक्षिण भारतात आहे. तामिळनाडूच्या वेल्लोरमधील या मंदिराला श्रीपुरम किंवा महालक्ष्मी सुवर्ण मंदिराच्या नावाने ओळखले जाते. हे मंदिर तयार करण्यासाठी १५०० किलो सोनं वापरण्यात आलं आहे. इतकं सोनं एखादं मंदिर तयार करण्यासाठी जगात कुठेच वापरण्यात आलेलं नाहीये. सोन्याने तयार करण्यात आलेल्या या मंदिरात लक्ष्मीची पूजा केली जाते.
वेल्लोर शहराच्या दक्षिणेत उभारण्यात आलेलं हे मंदिर तयार करण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च आला होता. मंदिराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे सोन्याच्या साधारण ९ ते १५ थर लावण्यात आले आहेत. श्रीपुरम येथील सरोवरही चांगलंच लोकप्रिय आहे. देशातील सर्वच प्रमुख नद्यांचं पाणी आणून या मंदिरात सरोवराची निर्मिती करण्यात आली आहे.
जवळपास १०० एकर परिसरात असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूने हिरवीगार झाडे लावण्यात आली आहेत. या मंदिरात प्रवेश करताना काही गोष्टी काळजी घ्यावी लागते. मंदिरात तुम्ही शॉर्ट परिधान करुन जाऊ शकत नाहीत. त्यासोबतच मंदिरात फोन, कॅमेरावर बंदी आहे.
हे मंदिर दर्शनासाठी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडं असतं. या मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत.