जेव्हा तुम्ही रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ (Bath) करता, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की त्या कालावधीत तुम्हाला अनेक कल्पना (Idea) सुचतात. नोकरीशी संबंधित असो अथवा घरातली कोणतीही समस्या तुम्हाला त्यावरचा उपाय हा अंघोळीदरम्यान सापडतो. असं का होतं?, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर बरेच लोक आपपल्या मतानुसार देऊ शकतात. पण आज आम्ही तुम्हाला याचं शास्त्रीय कारण सांगणार आहोत.
72 टक्के लोकांना आंघोळीदरम्यान अतिशय क्रिएटिव्ह कल्पना सुचतात, असं बिझनेस इनसाइडर वेबसाईटवरील 2016 च्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रीडर्स डायजेस्ट वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्या मेंदूतला (Brain) छोटासा भाग मेंदूचं अन्य कामावरचं लक्ष काढून टाकतो आणि त्याला शरीर स्वच्छ करण्याच्या कामात गुंतवतो. त्यावेळी अन्य कामांमधून उसंत मिळाल्याने दुसरा भाग विचारांमध्ये हरवून जातो. त्यामुळे या वेळी खूप चांगले विचार मनात येऊ लागतात आणि कल्पना सुचायला सुरुवात होते.
लाइफ हॅकर वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, जेव्हा आपण व्यायाम करतो, संगीत ऐकतो किंवा आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइन (Dopamine) मोठ्या प्रमाणात रिलीज होतं. डोपामाईन हे एक प्रकारचं हॉर्मोन (Hormone) आहे. ते रिलीज होताच माणसाला प्रेरणादायी वाटू लागतं, तो आनंदी राहतो आणि त्याला अनेक गोष्टी आठवू लागतात. डोपामाइन जास्त प्रमाणात रिलीज झालं तर माणसाला आरामदायी (Relax) वाटू लागतं. जेव्हा आपल्याला अधिक आरामदायी वाटतं, तेव्हा आपण स्वतःबद्दल अधिक विचार करू शकतो, चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवू शकतो. त्यामुळे अशावेळी मनात सर्जनशील कल्पना अधिक येतात.
आंघोळीवेळी चांगल्या कल्पना सुचण्यामागं अजून एक कारण आहे. आपण वर उल्लेख केल्यानुसार आपण दैनंदिन कामांपासून दूर जातो आणि मेंदूचा एक भाग शरीर स्वच्छ करण्यावर लक्ष केंद्रित करतो तर दुसरा भाग कल्पनांवर विचार करू लागतो. अशा परिस्थितीत माणसाचं मन सौम्य विचलित (Distracted) होणं हे देखील फायदेशीर आहे, असं शास्त्रज्ञ सांगतात. रीडर्स डायजेस्टच्या मते, या कारणामुळे, आपण जर कॉफी शॉपमध्ये काम करत असतो किंवा जॉगिंग करतो तेव्हा आपण जास्त उत्पादनक्षम बनतो. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी आंघोळ केली पाहिजे कारण डोपामाइन रिलीज झाल्याने मेंदूला काहीसा आराम मिळतो.