ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २४ - होळीनिमित्त देशभरात रंगांची उधळण करत सेलिब्रेशन सुरु असताना गुगलदेखील होळी साजरी करत आहे. सर्च इंजिन गुगलने डुडलच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल नेहमीच महत्वाच्या दिवशी डुडलद्वारे आपली भुमिका मांडतं असतं. त्याप्रमाणे होळीनिमित्त रंगांची उधळण करत गुगलदेखील सेलिब्रेशन करतं आहे. महत्वाचं म्हणजे या डुडलमध्ये कोणतेही रायायनिक रंग आणि पाण्याचा वापर करण्यात आलेला नाही.
होळीचं महत्व -
आपण साज-या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसर्याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किंमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते.