मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यात सध्या एका वयोवृद्ध आजी-आजोबाच्या बहादुरीची चर्चा रंगली आहे. कारण त्यांनी आपल्या जीवावर खेळून बिबट्याच्या तावडीतून आपल्या नातीचा जीव वाचवला. सध्या सगळीकडेच या घटनेची चर्चा सुरू आहे. घटना श्योपूर जिल्ह्यातील कराहल गावातील आहे. इथे जय सिंह गुर्जर आणि बसंती बाई आपल्या एक वर्षाच्या नातीसोबत अंगणात झोपले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात अचानक एक बिबट्या आला आणि आजी-आजोबासोबत झोपलेल्या नातीला तोंडात धरून पळून जात होता. बिबट्या तोंडात फसलेल्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने आजी-आजोबा उठले. जेव्हा त्यांना बिबट्याच्या तोंडात आपल्या नातीला बघितलं तर त्यांनी जीवाची पर्वा न करता त्याच्यावर झेप घेतली. संघर्षादरम्यान वयोवृद्ध आजी-आजोबांच्या हात आमणि शरीराच्या इतर भागावर बिबट्याच्या दातांचे आणि पंज्यांने केलेल्या जखमा आहेत.
बिबट्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही उठले आणि काही वेळातच गावातील लोक काठ्या घेऊन आले. तेव्हा बिबट्या घाबरून पळून गेला. आजोबांच्या पायात बिबट्याच्या दाताने गंभीर खोल जखम झाली आहे. ज्या गावात ही घटना घडली ते कुनो नॅशनल पार्कजवळ वसलेलं आहे. त्यामुळे इथे गावात आता भीतीचं वातावरण आहे. गावातील लोक आता रात्रभर पहारा देत जागे राहतात. जेणेकरून पुन्हा एखादा जंगली प्राणी गावात येऊ नये.