उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मॅनपुरी जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्या दिवशी नवरदेवाची वरात निघणार होती त्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. काही दुरूस्ती करताना घरातील हॅंडपंपचा पाइप हायटेंशन ताराला लागला आणि शॉक लागल्याने तरूणाचा मृत्यू (Groom Died On Marriage Day) झाला. या घटनेनंतर लग्न घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. असं सांगितलं जात आहे की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा दुरूस्ती काम सुरू होतं. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तीन लोक गंभीर जखमी झाले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तर नवरदेवाचा मृत्यू झाला.
ही घटना मॅनपुरीच्या नगला मान गावात घडली. या गावातून २० एप्रिलला प्रमोद यादवचा मुलगा अनुराग यादवची वरात जाणार होती. वरातीची जोरात तयारी सुरू होती. नातेवाईक पाहुणे एकत्र आले होते. पण अचानक घडलेल्या या घटनेने सगळं चित्र बदललं. लग्न घरात दु:खाचं सावट पसरलं.
बुधवारी दुपारी अनुराग आपला भाऊ अनुज आणि नातेवाईकांसोबत हॅंडपंपची दुरूस्ती करत होता. लोखंडी पाइप बाहेर काढताना पाइप वरच्या हायटेंशन ताराला लागला. अशात शॉक लागून दोन भावांसह तीन लोक भाजले गेले. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण नवरदेवाचा मृत्यू झाला.
दुसरीकडे नवरदेचा मृत्यू झाल्याचं समजताच नवरीच्या घरातही एकच गोंधळ उडाला. मुलीला कुणी दोष देऊ नये, नावं ठेवू नये याची चिंता तिच्या कुटुंबियांना होती. नवरीच्या कुटुंबियांनी लगेच दुसऱ्या तरूणाचा शोध घेणं सुरू केलं. त्याच परिसरातील एका गावातील एक परिवार आपल्या मुलाचं तरूणीसोबत लग्न लावण्यात तयार झाला. ज्यानंतर तरूणीचं ठरलेल्या वेळी लग्न लावून देण्यात आलं. रात्रीतूनच लग्नाचे सगळे रितीरिवाज पूर्ण करण्यात आले आणि सकाळी नवरीची पाठवणी करण्यात आली.