नवी दिल्ली - लग्नामध्ये फोटोग्राफरशी पंगा घेता कामा नये. कारण तो रागावला तर लग्नाचा अल्बम आणि व्हिडीओ दोन्हीही बिघडू शकतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लग्नाबाबतचा एक किस्सा तुम्ही वाचला तर लग्नसोहळ्यामध्ये तुम्ही फोटोग्राफरला दहा वेळा तरी जेवण केलं का म्हणून विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण एका फोटोग्राफरने लग्नात त्याच्यासोबत घडलेली घटना सोशल मीडियावर मांडत आपली व्यथा सांगितली आहे. या फोोग्राफरला लग्नात जेवण मिळालं नाही. त्यामुळे तो चांगलाच वैतागला. त्याने वराच्या डोळ्यांसमोरच लग्नाचे सगळे फोटो डिलीट करून तो तिथून निघून गेला. आता बरेच नेटिझन्स या प्रकरणात फोटोग्राफरचीच साथ देत आहेत.
लग्नात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरने या पोस्टमध्ये सांगितले की, मी फोटोग्राफर नाही आहे. मी तर डॉग ग्रुमर आहे. मी फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी दिवसभर कुत्र्यांचे ढिगभर फोटो काढत असतो. मात्र माझ्या मित्राने पैसे वाचवण्यासाठी त्याच्या लग्नात मला फोटोग्राफी करण्यास सांगितले. मी त्याला सांगितले की, मला हे काम येत नाही. मात्र त्याने परफेक्शनची गरज नसल्याचे सांगत मला हे काम करण्यास भाग पाडले.
फोटोग्राफर २५० डॉलरमध्ये (१८ हजार ५०० रुपये) हे काम करण्यास तयार झाला. त्याने ११ वाजता आपले काम सुरू केले. हे काम संध्याकाळी ७.३० च्या सुमारास संपणार होते. मात्र संध्याकाळी पाचच्या सुमारास जेवण वाढण्यात येत होते. तेव्हा मला फोटो काढायचे असल्याने जेवणासाठी थांबता येणार नाही असे सांगण्यात आले. माझ्यासाठी एकही टेबल रिकामी ठेवले गेले नाही.
हा फोटोग्राफर पुढे म्हणाला की, तो या कामामुळे खूप थकला होता. त्याला त्याच्या निर्णयाचे दु:ख होत होते. त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. तिथे एसी नसल्याने खूप गरम होत होते. तसेच आजूबाजूला पाणीही नव्हते. त्यामुळे मला खाण्यापिण्यासाठी २० मिनिटांचा ब्रेक हवा आहे, असे नवऱ्याला सांगितले. मात्र नवरदेवाने त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्याने एकतर फोटोग्राफी कर नाही तर पैसे न घेता घरी निघून जा असे या नवरदेवाला सांगितले.
नवरदेवाचे हे बोलणे ऐकून फोटोग्राफरची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने नवरदेवाला विचारले की अगदी नक्की ना, त्यावर नवरदेव हो म्हणाला. त्याचे हे उदगार ऐकताच फोटोग्राफरने कॅमेऱ्यात काढलेले सर्व फोटो नवरदेवासमोरच डिलीट केले. तसेच आता मी तुमचा फोटोग्राफर नाही असे सांगत तो तिथून निघून गेला. दरम्यान, लग्न झाल्यानंतर हे कपल हनिमूनसाठी गेले होते. मात्र ते आता सोशल मीडियापासूनही दूर आहेत. कारण लोक त्यांना लग्नाच्या फोटोंबाबत विचारत आहेत.