गेल्या २ वर्षापासून कोरोना व्हायरसमुळे अनेक सोहळ्यांवर निर्बंध आले आहे. कोरोनामुळे गर्दी करु नये, सोशल डिस्टेसिंगचं पालन करावं अशी वारंवार सूचना सरकारकडून केली जातेय. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी विवाह सोहळे इतर समारंभावर निर्बंध आणले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडावा लागत आहेत. त्यात काही मंडळ या निर्बंधामध्ये हटके पर्याय निवडत आहेत.
कोरोना काळात काही ठिकाणी व्हर्चुअलच्या माध्यमातून लग्न केले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका जोडप्याने लग्नासाठी तब्बल ४५० लोकांना आमंत्रित केले आहे. आता तुम्ही म्हणाल कोरोना काळात इतक्या लोकांना लग्नाला बोलवण्याची गरज काय? पण थांबा, या जोडप्याने कोरोनाचा भान राखत व्हर्चुअल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लग्न करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या कुठल्याही निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री आहे.
कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये लग्नासाठी केवळ २०० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु सदीपन सरकार आणि आदिती दास या जोडप्याने लोकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. संदीपन आणि आदितीनं लग्नसोहळा हटके करण्याच्या प्रयत्नात ४५० जणांना गुगल मिटद्वारे लग्नात उपस्थित राहण्याचं आमंत्रण धाडलं आहे.
येत्या २४ जानेवारीला हे जोडपे लग्न करणार असून लग्नाबाबत संदीपननं न्यूज १८ शी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला की, मागील वर्षभरापासून आम्ही लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. अलीकडेच मलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. त्यामुळे आपल्या लग्नात कुणाचाही जीव धोक्यात घालायचा नाही असा चंग संदीपननं बांधला. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत Google Meet लिंक पाठवून पाहुण्यांना लग्नात उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.
इतक्यावरच संदीपन आणि आदिती थांबले नाहीत तर लग्नात उपस्थित राहणाऱ्या ४५० पाहुण्यांना ई मेजवाणीही दिली जाणार आहे. आता ई मेजवाणी हा काय प्रकार आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. लग्नाची गुगल लिंक पाठवून पाहुण्यांना उपस्थित राहता येईल मग मेजवानी कशी द्यायची असा विचार सुरु झाला. तेव्हा व्हर्चुअल पद्धतीने एकाच वेळी सर्व पाहुण्यांना जेवणाची डिलिव्हरी होणार आहे. त्यासाठी या जोडप्याने फूड डिलिव्हरी App झोमॅटोची मदत घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या या हटके लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.