ब्राझील - झोपाळ्यावर झुलायला प्रत्येकालाच आवडतं. पण एका मोठ्या पुलाखाली बांधलेल्या दोरखंडावर कोणी तुम्हाला झुलायला सांगितलं तर तुम्हाला अख्खं ब्रम्हांडच आठवेल. मात्र ब्राझीलच्या एका नदीकिनारी असा थरार नुकताच अनुभवायला मिळाला आहे. या थराराची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.
ब्राझीलच्या एका पुलावर जवळपास 245 माणसे उभी होती. ही सर्व माणसे अचानक पुलालाच बांधलेल्या दोरखंड्यावर गटांगळ्या खाऊ लागली. खाली वाहती नदी होती, नदीत अनेक लहान-मोठे दगडं आहेत. कोणी चुकूनही दोरखंडातून खाली पडला असता तर त्याचा जागीच मृत्यू झाला असता अशी भयाण परिस्थिती तिथे असतानाही असा थरार करण्यात आला. पाहा व्हिडीयो
ब्राझीलचे अनेक नागरिक गिनिज वर्ल्डमध्ये नाव नोंदण्यासाठी अनेक उपक्रम करत असतात. हा उपक्रमही त्यातीलच एक असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कारण थोडासा जरी हलगर्जीपणा झाला असता तर नाहक लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले असते.
साहजिकच असे सारे उपक्रम मार्गदर्शकांच्या अनुभवातून आणि त्यांच्या सुचनेनुसारच होत असतात. त्यामुळे मार्गदर्शनाशिवाय कोणीही असे उपक्रम करू नये असाही सल्ला सोशल मीडियातून दिला जात आहे. गेल्यावर्षी 149 लोकांनी अशाप्रकारे झुलण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही त्यांची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. यंदा त्यांनीच त्यांचा विक्रम मोडीत काढून पुन्हा गिनिज वर्ल्डमध्ये नाव कोरलं आहे.