(Image Credit :weddingsonline India)
भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव. सामान्यपणे नवरदेव वरात घेऊ नवरीच्या घरी जातो. वेगवेगळे रिवाज करून दोघेही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतात. नवरदेव नवरीला आपल्या घरी घेऊन येतो. प्रत्येक लग्नाची साधारण अशी कहाणी असते. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कहाणी या लग्नांपेक्षा वेगळी आहे.
गुजरातच्या छोटा उदयपुरमध्ये लग्ने इतर ठिकाणी होतात तशीच सामान्यपणे होतात. पण येथील सुरखेडा, अंबाला आणि सनाडा या तीन गावांमध्ये राहणारे राठवा समाजातील लग्नांमधून नवरदेव गायब असतो. होय. इथे नवरदेवाशिवायच लग्न लागतं. ही बाब भलेही आश्चर्यकारक आहे. पण ही येथील परंपरा आहे.
मुलीचं मुलीशी लग्न
इथे नवरीला आणण्यासाठी नवरदेव जात नाही. तो त्याच्या घरी नवरीची वाट बघत बसलेला असतो. नवरदेवाच्या जागी त्याची अविवाहित बहीण घोडीवर बसते आणि वरात घेऊन नवरीच्या घरी जाते. नवदेवाची बहिणच नवरदेवासारखी श्रृंगार करते. इतर लग्नांमध्ये होतात त्या सर्व गोष्टी या लग्नात होता. नवरी तिच्या नणंदेला हार घालते आणि नणंद तिच्या वहिणीला. इतकेच नाही तर दोघी सप्तपदीही घेतात. आणि नवरीला घरी घेऊन जातात.
काय आहे मान्यता
या समाजातील लोकांचं म्हणणं आहे की, ही परंपरा गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. असे म्हटले जाते की, या गावातील देव अविवाहित आहेत. त्यामुळे कोणताही मुलगा लग्न करू शकत नाही. या गावातील देव अविवाहित देवांची परंपरा पाळतात. इथे कोणताही मुलगा लग्नासाठी नवरीच्या घरी जात नाही. जर नवरदेव घोडीवर बसून मंडपात गेला तर अशुभ मानलं जातं. असे म्हणतात की, ही परंपरा मोडली तर देव नाराज होतात, ज्यामुळे नवरदेवाला नुकसान पोहोचू शकतं. तसेच त्यांचा वंशही पुढे वाढत नाही.
बहीण का जाते?
या गावात अशीही मान्यता आहे की, अविवाहित बहीण भावासाठी कवचासारखी असेत, जी त्याला वाईट नजरेपासून वाचवते. बहिणीला भावाची रक्षक मानलं जातं. ती नव्या जीवनात प्रवेश करणाऱ्या भावाची मदत करते.
सासुरवाडीला जाऊन पुन्हा होतं लग्न
नवरीच्या घरी होणाऱ्या लग्नात नवरदेवाची बहीण डोक्यावर टोपली ठेवून लग्नाच्या सर्व विधी पार पाडते आणि वहिणीला घरी घेऊन येते. ती नवरीला नवरदेवाकडे सुपूर्द करते आणि तिची जबाबदारी संपते. सासुरवाडीला आल्यावर नवरीला नवरदेवासोबत पुन्हा सगळ्या विधीनुसार लग्न करावं लागतं. असे म्हणतात की, नवरदेवाची बहीण अविवाहित असणं गरजेचं आहे. जर त्याला सख्खी बहीण नसेल तर त्याची चुलत बहीण, मामे बहीणही या विधी करू शकते.
मुलीकडील लोकांना द्यावा लागत नाही हुंडा
या अनोख्या लग्नाची एक आणखी खास बाब म्हणजे इथे नवरीच्या घरातील लोकांना हुंडा द्यावा लागत नाही. उलट नवरी आणण्यासाठी नवरदेवाकडील लोकच नवरीकडील लोकांना हुंडा देतात.