सीरिअल किलर, डाकूंसारख्या गुन्हेगारांच्या एनकाउंटरचे किस्से तर तुम्ही अनेकदा ऐकले असतील. त्यांच्यावर सिनेमेही बनतात. पुस्तकं लिहिली जातात. पोलीस केससंबंधी पुरावे वर्षानुवर्षे सांभाळून ठेवतात. पण तुम्ही कधी विचार केला नसेल की, एका गुन्हेगाला ज्या पिस्तुलाने ठार केलं असेल, ती सवाशे वर्षापर्यंत सांभाळूनच ठेवली नाही तर लिलावात या पिस्तुल जगातली सर्वात महागडी पिस्तुल म्हणून विकली गेली.
अमेरिकेतील कुख्यात डाकू बिली द किडला याच पिस्तुलाने ठार करण्यात आलं होतं. बिलीला शेरिफ पेट गॅरेटने मारलं होतं आणि आता त्या पिस्तुलाचा लिलाव करण्यात आलाय. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही पिस्तुल ६ मिलियन डॉलर(४३ कोटी रूपये)ला विकली गेली. लिलाव संस्थेला याचा अजिबात अंदाज नव्हता की, इतकी मोठी रक्कम मिळेल. या पिस्तुलावर लागलेली बोली त्यांच्या अंदाजानुसार दुप्पट आहे.
जगातली सर्वात महागडी पिस्तुल
ऑक्शन हाउस बोनहम्सनुसार, ही जगातील सर्वात किंमती पिस्तुल आहे. याआधी कधीही कोणत्या पिस्तुलाला इतकी मोठी रक्कम मिळाली नाही. बोनहम्सनुसार, ही पिस्तुल वाइल्ड वेस्टच्या सर्वात लोकप्रिय कथांपैकी एक निशाणी म्हणून सुरक्षित ठेवण्यात आली होती.
बिली द किडचं बालपणीचं नाव हेनरी मॅककार्टी होतं. नंतर त्याने ते बदललं होतं. बिलीला ८ लोकांच्या हत्येप्रकरणी एप्रिल १८८१ मध्ये वयाच्या २१व्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण बिली तुरूंगातून फरार झाला होता. काही महिन्यांनी त्याला या पिस्तुलाने शेरिफ गॅरेटने गोळी मारली होती. या पिस्तुलाचा याआधीही लिलाव झाला होता, त्यावेळी या पिस्तुलाला १४.५५ कोटी रूपये किंमत मिळाली होती.