लंडन : युट्यूबवर लाखो रुपये कमवणारे आपण कित्येक पाहिले आहेत. ब्लॉगरचा जमाना गेला आणि आता व्लॉगरचा जमाना आला आहे. त्यामुळे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक जण लाखो रुपये कमवतात. असाच एक युट्यूबर सध्या चर्चेत आला आहे. त्याच्या व्लॉगमुळे तो महिन्याला 6 लाखांच्या घरात कमाई करतो. कारण त्याचा व्लॉगचा विषयही तसाच हटके आहे. कार टेस्टिंग करून त्याचे रिव्ह्यू प्रेक्षकांना द्यायचे, हा त्याचा विषय असून त्याचे अनेक फॉलोवर्सही आहेत.
लंडनमध्ये राहणारा टॉम एक्स्टोन (30) याला गाड्यांचा रिव्ह्यू लिहायचा अनोखा छंद जडला. लहानपणापासूनच त्याला गाड्यांविषयी अप्रुप असायचं. त्यामुळे विविध गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह करून त्याने सुरुवातीला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. हे रिव्ह्यू तो सोशल मीडियावर अपलोड करत होता. त्याच्या या रिव्ह्यूमुळे सोशल मीडियावर त्याचे फॅन्स वाढत गेले. कालांतराने त्याने हे रिव्ह्यू व्हिडिओ स्वरुपात करणं सुरू केलं. त्यामुळे त्याच्या फॉलोवर्समध्ये आणखी वाढ झाली. त्याचे सबस्क्राबर्स वाढत गेले. आता तो महिन्याला तब्बल 6 लाखांपेक्षाही अधिक कमाई करतो.
त्याने आतापर्यंत दिलेल्या गाड्यांचे रिव्ह्यू अगदी तंतोतंत बरोबर असतात असं त्याच्या फॉलोव्हर्सचं म्हणणं असतं. त्यामुळे एखादी गाडी खरेदी करायला जाताना त्याचा रिव्ह्यू आवर्जून पाहिला जातो. आपल्याकडे चित्रपट पाहायला जाताना रिव्ह्यू पाहण्यची पद्धत आहे. म्हणून आपण वर्तमानपत्र किंवा चॅनेलने दाखवलेल्या रिव्ह्यू वाचून/पाहूनच कोणता चित्रपट पहायचा हे ठरवतो. त्यानुसारच कारप्रेमी टॉम यांचे कार रिव्ह्यू पाहूनच कोणती कार विकत घ्यायची हे ठरवतात. टॉम यांनी आतापर्यंत लेम्बोर्गिनी, पोर्शे, पगानी, रेंज रोव्हर या कारच्याही रिव्ह्यू केल्या आहेत.
टॉम हे नवनव्या आणि प्रसिद्ध गाड्यांसोबत फोटो काढतात आणि इन्स्टाग्रामवर अपलोड करतात. त्यामुळे यांच्या इन्स्टाग्रामवर तब्बल 1 लाख 45 हजार फॉलोव्हर्स झाले आहेत. तर, युट्यूबवर 82 हजार 865 सबस्क्राबर्स आहेत. या सबस्क्रायबर्सच्या जोरावरच त्यांची लाखोंच्या घरात उलाढाल सुरू आहे. पण एक धक्कादायक गोष्ट इथं सांगणं गरजेचं आहे. नव्या, प्रशस्त गाड्यांची स्वप्न प्रत्येक मुलीला पडतात. आपल्या प्रियकराकडे अशी प्रशस्त गाडी असायला हवी असं प्रत्येक प्रेयसीला वाटतं. मात्र टॉम यांची गर्लफ्रेंड याबाबतीत अपवाद आहे. टॉम यांचा हा छंद तिला अजिबात आवडत नाही. पण तरीही प्रेयसीच्या मनाविरुद्ध तो त्याचा छंद जोपासत आहे.
आणखी वाचा - स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम हॅक करून ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ