(Image Credit : medicalnewstoday.com)
तामिळनाडूमध्ये घडलेली एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. इथे एका १३ वर्षीय मुलीच्या पोटातून अर्धा किलो मनुष्यांचे केस, प्लास्टिकचे तुकडे आणि शॅम्पूची रिकामी पाकिटे काढण्यात आलीत. सातव्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वेदना होत होत्या. कुटूंबियांनी तिला लगेच हॉस्पिटमध्ये दाखल केलं. त्यानंतर स्कॅनिंग केल्यावर डॉक्टरांना तिच्या पोटात जे दिसलं ते पाहून तेही हैराण झाले.
हॉस्पिटलचे चेअरमन वी.जी. मोहनप्रसाद यांनी सांगितले की, जेव्हा या मुलीच्या पोटाचं स्कॅनिंग करण्यात आलं तेव्हा तिच्या पोटात बॉलसारखी वस्तू दिसली. ही वस्तू एंडोस्कोपी करून काढण्याचा आम्ही निर्णय घेतला. पण डॉक्टरांना यात यश आलं नाही. नंतर सर्जरी करून पोटातील वस्तू काढण्याचं ठरलं. तेव्हा डॉक्टरांनी सर्जरी करून तिच्या पोटातून मनुष्याचे केस, शॅम्पूची पाकिटे काढलीत.
सर्जरी करणारे डॉक्टर गोकुल कृपाशंकर यांनी सांगितले की, मुलीच्या एका जवळच्या नातेवाईकाचं निधन झालं होतं. त्यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. या कारणाने ती रिकामी पाकिटे, केस अशा विचित्र गोष्टी खाऊ लागली. अर्थातच याच कारणाने तिच्या पोटात वेदना होत होत्या. आता ती पूर्णपणे बरी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, एखाद्या व्यक्तीच्या पोटातून अशाप्रकारच्या विचित्र वस्तू काढण्यात आल्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा चीनमध्ये एका १४ वर्षीय मुलीच्या पोटातून १०० पेक्षा जास्त बबल टी बॉल्स काढण्यात आले होते. तसेच उत्तर प्रदेशातील एका मुलीच्या पोटातून खूपसारे केस काढण्यात आले होते. ती तिचे केस खात होती. डॉक्टर सांगतात की, हा एक तारकोबेजार नावाचा आजार आहे. ज्यात व्यक्ती स्वत:चे केस खातो.