ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आणि देशातील कोट्यवधी मुलींचे प्रेरणास्थान असलेल्या कल्पना चावलाचा आज वाढदिवस आहे. कल्पनाने न केवळ अंतराळ विश्वात यश मिळवलं होतं तर तिनं तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वप्न जगायला लावणं शिकवलं, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा दिली.
या अवकाशपरीने वयाच्या 41व्या वर्षी पहिली अंतराळ यात्रा केली आणि दुर्देवानं ती कल्पनासाठी अखेरची ठरली. 'मी अंतराळ विश्वासाठी जन्मले आहे. प्रत्येक क्षण मी या विश्वासाठीच घालवला आहे आणि या विश्वासाठीच मी मरणार', तिचे हे वाक्य अखेर खरे ठरले.
घरात सर्वात लहान होती कल्पना
हरियाणातील कर्नाल येथे 17 मार्च 1962 साली कल्पनाचा जन्म झाला. बनारसीलाल चावला आणि संज्योती हे तिचे आईवडील. चार भावंडांमध्ये कल्पना सर्वात लहान. घरातील सर्व मंडळी लाडाने तिला 'मॉन्टो' म्हणून हाक मारायचे. कल्पनाचे शालेय शिक्षण कर्नालमधील टागोर बाल निकेतन विद्यालयमध्ये झाले. इयत्ता आठवीमध्ये असताना तिने आईवडिलांकडे इंजिनिअर बनण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, कल्पनाने डॉक्टर किंवा शिक्षिका व्हावं, असे वडिलांना वाटायचे. लहानपणापासून कल्पनाला अंतराळयान आकाशात कसं झेपावते, स्थिरावते?, मी अंतराळयानातून उडू शकते का?, असे प्रश्न पडायचे. पण तिचे वडील हसून या गोष्टी टाळायचे, असे कल्पनाचे नातेवाईक सांगतात.
अपयशाला घाबरली नाही
'कल्पना आळशी नव्हती ती एका योद्धाप्रमाणे होती. अपयशाला न घाबरता जे मनात ठरवलं आहे त पूर्ण करायचंच, असा तिचा स्वभाव होता', असे तिच्या वडिलांना सांगितले. शालेय शिक्षणानंतर कल्पना पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून 1982 साली पदवीधर झाली. यानंतर 1984 साली अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये तिने पुढील शिक्षण घेतले.
कल्पनाला कविता, डान्स करणे, सायकलिंग आणि रनिंग करणे आवडायचे. स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये ती नेहमी धावण्याच्या शर्यती जिंकायची. ती नेहमी मुलांबरोबर बॅडमिंटन आणि डॉजबॉलही खेळायची.
कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होती. तिच्याकडे सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी ती सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होती.
1991 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पनाने नासामध्ये अॅस्ट्रोनॉट कॉर्प्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
नासाच्या अंतराळवीर समूहात निवड
1995 साली कल्पना यांची नासाच्या अंतराळीवर समूहात निवड झाली. 1998 मध्ये कल्पनाला तिच्या पहिल्या उड्डाणासाठी निवडण्यात आले. विशेष म्हणजे, अंतराळात झेपावणारी कल्पना पहिली भारतीय महिला होती. मिशन विशेषज्ञ म्हणून तिनं एसटीएस-87 वर काम केले. अवकाशात तिनं 376 तास व 34 मिनिटे प्रवास केला.
1 फेब्रुवारी 2003 काळा दिवस
यानंतर 1 फेब्रुवारी 2003 या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांच्यासह 6 अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ देशात अनेक योजना सुरू करण्यात आल्या. हरियाणा सरकारने कर्नालमध्ये सरकारी हॉस्पिटलचे नाव 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज' ठेवले.
दरम्यान, अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पनाला अनेक पुरस्कार मिळाले होते. स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.
या उड्डाणपरीला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा...