मुंबई : बॉलिवूडचा ग्रीक गॉड ह्रितिक रोशन आज त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच त्याच्या अभिनयासोबत त्याच्या कमालीच्या नृत्यकौशल्याचं कौतुक झालं. सर्वच सिनेमात त्याने आपल्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यापैकी सर्वच गाण्यांचा उल्लेख इथे आपण करु शकत नाही, मात्र ही काही गाणी जी आपण विसरुच शकत नाही, अशी आहेत. पाहुयात त्याच्या काही डान्स स्टेप्स ज्या त्याच्या सिग्नेचर स्टेप्स झाल्या.
१) एक पल का जीना - कहो ना प्यार है
२००० साली आलेल्या या त्याच्या पहिल्या चित्रपटातच त्याचं नृत्य बघून सर्वांनीच आ वासले. कोरिओग्राफर फराह खानसह ह्रितिकलाही तेव्हा या नृत्यासाठी अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. ९०च्या दशकातल्या प्रत्येकाने या गाण्यावर नक्कीच कुठे ना कुठे डान्स केलाच असणार. अजूनही टनानना टनानना ही म्युझिक वाजताच एक हात पुढे जाऊन एक हात कमरेकडे येऊन आपण आपोआप नाचु लागतो. याला म्हणतात डान्सचा एक स्टॅंडर्ड सेट करणं.
२) बावरे - लक बाय चान्स
२००९मध्ये आलेल्या झोया अख्तरच्या लक बाय चान्स या चित्रपटात ह्रितिकने एका चित्रपटसृष्टीतल्या स्ट्रगलरची भूमिका केली आहे. त्या चित्रपटातील बावरे या लोकनृत्यसदृश गाण्यावरील त्याचा डान्स सर्वांनाच अवाक् करुन गेला.
३) यु आर माय सोनिया - कभी खुशी कभी गम
२००३ साली आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर गल्ला जमवलाच सोबत क्रिटीक्सचं कौतुकही मिळवलं. मल्टी स्टारर चित्रपटात परदेशातील पबमध्ये चित्रीत केलेल्या या गाण्यात ह्रितिकसोबत करीना कपूरनेही आपलं नृत्यकौशल्य दाखवलं. त्याच्या सिग्नेचर स्टेप्स आजही ९०च्या दशकातल्या मुलांना माहीत आहेत आणि लक्षात आहेत.
४) मैं ऐसा क्यों हूँ - लक्ष्य
२००४मध्ये आलेल्या या चित्रपटात ह्रितिकने एका रिकामटेकड्या मुलाचा एक आर्मी ऑफीसर होतानाची भूमिका बजावली आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातील या गाण्यात ह्रितिकने जादुई नृत्य केलं आहे. आपण ते फक्त पाहत राहतो, पाहत राहतो आणि पाहत राहतो.
५) धुम अगेन - धुम २
धुम सीरिजमधला धुम २ हा चित्रपट २००६ साली चित्रपटगृहात आला. शामक दावर या झाज आणि वेस्टर्न स्टाईल डान्स कोरिओग्राफरने ह्रितिकवर अतिशय सुंदररित्या हे गाणं दिग्दर्शित केलं. या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी शामक दावरसह ह्रितिकचंही फार कौतुक आणि सन्मान झालं.