सुरेश भटेवरा, नवी दिल्ली भारतीय शास्त्रीय संगीतात संवादिनी (हार्मोनियम) केवळ सहायक वाद्य नसून, सितार, सरोद, बासरी, शहनाई यांच्याप्रमाणेच स्वतंत्र प्रतिभेचे (सोलो) वाद्य आहे. संवादिनीला संगीतात ज्यांनी अद्वितीय प्रतिष्ठा मिळवून दिली, आयुष्यभराची संगीतसाधना त्यासाठी पणाला लावली, त्या पंडित मनोहर चिमोटे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी, शुक्रवारी संवादिनी फाउंडेशनच्या वतीने भारतीय शास्त्रीय संगीताला www.panditmanoharchimote.com ही बेबसाइट समर्पित केली आहे.
पंडित मनोहर चिमोटे हे भारतीय शास्त्रीय संगीताचे अभ्यासकच नव्हे, तर तज्ज्ञ जाणकार होते. जुन्या धाटणीच्या हार्मोनियममधे अनेक सूक्ष्म व तांत्रिक बदल घडवून संवादिनीचे रूपांतर भारतीय शास्त्रीय संगीताला अनुकूल असे अनुपम वाद्य बनवण्यात त्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावले. संवादिनीवर पंडित चिमोटेंनी अनेक वर्षे केवळ संगीतसाधनाच केली नाही, तर संवादिनी वादनात अनेक शिष्यही तयार केले.
पंडितजींंचे ज्येष्ठ शिष्य भानू जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंडित चिमोटेंची संगीत साधना, संगीत क्षेत्रात त्यांनी निर्मिलेली सुरेल परंपरा, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात पंडितजींचे योगदान, या संबंधी सारे दस्तऐवज, जुनी छायाचित्रे, दुर्मीळ दृकश्राव्य रेकॉर्डिंग, वेळोवेळची वृत्तपत्र कात्रणे इत्यादींचे संकलन करून त्याचा समावेश वेबसाइटवर केला आहे. पंडितजींच्या शिष्यांनी आपल्या गुरूवर्यांच्या स्मृतिदिनी त्यांना दिलेली ही अलौकिक स्मरणवंदना, इंटरनेटवर भारतीय संगीत क्षेत्रातील विशेष माहितीचे महत्त्वाचे दालन ठरणार आहे.