नवी दिल्ली - देशात एकीकडे रोजगाराबाबत लोक विविध प्रकारे आंदोलने करून संताप व्यक्त करत आहेत आणि रोजगार देण्याची मागणी करत आहेत. त्याच वेळी असेही काही लोक आहेत ज्यांना त्यांच्या नोकरीतून समाधान मिळत नाही. आजच्या काळात नोकरी मिळवणं जितकं कठीण आहे तितकच कामाच्या प्रेशरचीही समस्या असते. व्यस्त वेळापत्रकामुळे बहुतेकांना नोकरीत शांतता, आनंद आणि समाधान मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत काही लोकांना नोकरी सोडणेच बरं वाटतं. याच दरम्यान एक रेजिग्नेशन लेटर (Resignation Letter) व्हायरल होत असून यामध्ये व्यक्तीने आपलं दु:ख शेअर केलं आहे.
रेजिग्नेशन लेटरची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या राजीनामा पत्रात "प्रिय हर्ष, मी राजीनामा देत आहे, मला मजा येत नाही, तुझा राजेश..." असं लिहिलं आहे. खरं तर कार्यालयात मेलद्वारे किंवा लेखी नमुन्याच्या आधारे राजीनामा दिला जातो. पण इंटरनेटवर तुफान व्हायरल होणारा हा राजीनामा अत्यंत सोप्या शब्दात लिहिला आहे. राजीनामा पत्र शेअर करताना हर्ष गोयंका यांनी लिहिलं आहे की "हे पत्र लहान आहे पण खूप खोल आहे. ही एक गंभीर समस्या आहे, जी आपण सर्वांनी सोडवली पाहिजे". याचा स्क्रीनशॉट हर्ष गोएंका यांनी ट्विटरसोबतच लिंक्डइनवर शेअर केला आहे.
उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावर अनेकदा अजब-गजब पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या अनेक पोस्ट्स इतक्या मजेदार असतात की काही मिनिटांतच त्या जोरदार व्हायरल होतात. राजेश नावाच्या व्यक्तीने कार्यालयात दिलेल्या राजीनाम्याचा फोटो शेअर केला आहे. जे पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या पोस्टला आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या पत्रात 18 जून ही तारीख लिहिली आहे.
या पोस्टवर सर्व युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणाले की कर्मचारी 'टू द पॉइंट' बोलत आहे असे दिसते, तर कोणी विचारले की त्याला काय अडचण आहे? त्याचवेळी एका युजरने लिहिले की, 'राजीनामा लिहिणारी व्यक्ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे.' त्याचवेळी आणखी एका युजरने 'या राजीनाम्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही' असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.