नवी दिल्ली - अभ्यास, परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. पण कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. काही विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी चित्रपटातील गाणी अथवा डायलॉग लिहितात. तर काही जण वाटेल ते लिहितात. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये लिहिलेली उत्तरं पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. बोर्डाच्या परीक्षा हा मुलांसाठी महत्त्वाचा टप्पा असतो. हरियाणा बोर्डाच्या परीक्षेतही काही मुलांनी अशीच भन्नाट उत्तरे लिहिली आहेत.
"तुमच्या मुलीशी मैत्री करून द्या"
नुकत्याच हरियाणा शालेय शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या आणि आता ते पेपर तपासले जात आहे. याच दरम्यान उत्तरपत्रिकांमधील प्रश्नांच्या उत्तरांव्यतिरिक्त अनेक विचित्र गोष्टीही समोर आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिले आहे की, 'मी खूप चांगला मुलगा आहे, मॅडम प्लीझ मला पास करा. तुमच्या मुलीशी माझी मैत्री करून द्या'
"काही नाही झालं तर मी आत्महत्या करेन"
एका विद्यार्थिनीने एका प्रश्नाच्या उत्तरात उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे की, "सर माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम चालू आहेत, खूप काही चुकीचं होत आहे, पप्पांनी तर म्हंटलं आहे की जर तू चांगल्या मार्कांनी पास झाली नाहीस तर तुझं लग्न करून देऊ. विद्यार्थिनीने उत्तरपत्रिकेत पुढे लिहिले आहे की तिची आई सावत्र आई आहे आणि तिचे वडील दारू पितात. माझ्याशी चांगले वागत नाहीत आणि तिची आई देखील चांगली वागत नाही."
एवढेच नाही तर या विद्यार्थिनीने असेही लिहिले आहे की, तिने देवाशिवाय दुसरं कोणाकडे काहीही मागितले नाही, आज ती आपलं आयुष्य मागत आहे. विद्यार्थिनीने पेपरमध्ये लिहिले आहे, 'काही झाले नाही तर मी आत्महत्या करेन. सर, मला मदत करा. या विद्यार्थिनीने तिची समस्या दोन पानांत लिहिली आहे. अशी अनेक उत्तरे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे पाहून विद्यार्थी जोमात आणि शिक्षक कोमात असंच म्हणावं लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.