हरयाणाच्या जींद जिल्ह्यात एक वळू घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढला होता. तीन तासांच्या मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला क्रेनच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आलं. ही घटना जींदच्या मंडीतील आहे. वळू अचानक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढल्याची सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती आणि तीन तासांनंतर वळूला खाली उतरवण्यात आलं.
घटनास्थळी पोहोचलेल्या पशुपालन विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले की, मंडीतील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर एक वळू चढून गेल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वॅक्सीनेशनची तयारी मधेच सोडून इथे पोहोचलो. ते म्हणाले की, आधी वळूला नशेचं औषध देण्यात आलं आणि नंतर सर्वसामान्य लोकांच्या मदतीने त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात आलं.
त्यांनी सांगितलं की, हे घर फार जुनं होतं. त्यामुळे घराच्या छतावरून वळूला सुरक्षित खाली उतरवणं फारच रिस्की होतं. बरेच लोकही घराच्या छतावर चढले होते. मात्र, वळूला चारही बाजूने पट्टे बांधून सुरक्षित खाली उरतवण्यात आलं.
या घराच्या मालकांनी सांगितली की, आज सकाळी पावसापासून वाचण्यासाठी वळू घराच्या छतावर चढला होता. हे कळताच त्यांनी पशुपालन विभागाला माहिती दिली. वळू घरावर चढला म्हटल्यावर त्याला बघण्यासाठीही लोकांची गर्दी जमली होती. साधारण तीन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला खाली उतरवण्यात आलं होतं.