सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. दारू म्हटलं की तळीरामाना एक वेगळाच उत्साह येतो. पण फक्त तळीरामच नाही तर उंदरंसुद्धा दारू पिण्याच्या बाबतीत काही कमी नाहीत. विश्वास बसत नसेल ना? पण हे खरं आहे. हरियाणातील (Haryana) फरीदाबाद (Faridabad) शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस ठाण्याच्या गोडाऊनमधून 29 हजार लिटर दारूच्या (Liquor) बाटल्या आणि कंटेनर गायब झाले आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की, हे काम उंदरांनी केले आहे. उंदरांनी (Rat) मद्याबरोबर गांजा, अफू या मादक पदार्थांची पाकिटेही कुरतडली आहेत. एका वर्षानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून डेटा गोळा केला जात होता. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
८२४ प्रकरणांपैकी कोर्टानं 49 प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे. अशा स्थितीत पोलीस या महिन्यात ९८२ लिटर देशी दारू, ११६९ इंग्रजी दारू आणि ३० बिअर कॅन नष्ट करतील. ही दारु नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. या समितीत इतर दोन अधिकारी आणि मान्यवरांचा समावेश असेल.
पोलिसी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंदरांनी जास्तीत जास्त देशी दारूच्या बाटल्या कुरतडल्या आहेत. देशी दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या आहेत. त्याचवेळी, कच्चे मद्य प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये देखील असते. अशावेळी उंदरांनी त्यांचे अधिक नुकसान केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उंदरांंमुळे देशी आणि कच्ची दारु असे सुमारे २०,००० लिटर मद्य वाया गेले आहे. उंदरांच्या कुरतडल्यामुळे दारु वाहून गेली आहे. त्याचवेळी इंग्रजी दारुच्या बाटल्यांचे झाकण तोडून उंदीरांनी जप्त केलेली सुमारे 9 हजार लिटर दारू गायब केली, असंही पोलिसांनी सांगितले आहे.