चंदिगढ: हरयाणातील एका व्यक्तीला पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ही व्यक्ती भर उन्हाळ्यात थंडीनं कुडकुडते आणि जेव्हा सर्वांना थंडी वाजते, तेव्हा या व्यक्तीला घाम फुटतो. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटलं असेल. मात्र हे खरं आहे. महेंद्रगढच्या संतराम नावाच्या व्यक्तीसोबत लहानपणापासूनच असं घडतं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं ट्विट केल्यानं संतराम सध्या चर्चेत आले आहेत. संतराम यांना उन्हाळ्यात खूप थंडी वाजते. त्यामुळे ज्या दिवसात लोक कमीतकमी कपडे घालणं पसंत करतात, त्या दिवसात संतराम अंगावर चादर घेऊन गावात फिरतात. उन्हाळ्याच्या दिवसात लोक फारसं घराबाहेर पडत नाहीत. मात्र संतराम यांना थंडी वाजत असल्यानं ते उन्हात भटकत असतात. थंडीचा हंगाम सुरू झाला की मग परिस्थिती उलट होते. इतर लोक गारठून जात असताना संतराम यांना गरम होतं. मग या दिवसांमध्ये संतराम चक्क बर्फ खातात. इतकंच नव्हे, तर संतराम यांना थंडीत दरदरुन घाम फुटतो. संतराम यांच्यासोबत लहानपणापासूनच असं होत असल्याचं त्यांच्या आसपास राहणारे लोक सांगतात. एएनआयचं संतराम यांच्याबद्दलचं वृत्त ट्विट केलं होतं. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. त्यांच्या या ट्विटला 250 लाईक्स आणि 132 रिट्विट्सदेखील मिळाले. तेव्हापासून संतराम यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. संतराम यांच्यासोबत असं का घडतं, याचं वैद्यकीय कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
'या' व्यक्तीला उन्हाळ्यात वाजते थंडी अन् थंडीत दरदरुन फुटतो घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 6:12 PM