चंडीगड - सासू-सुनेतील वैर नेहमी आपण ऐकत असतो. सून सासू-सासऱ्यांचा सांभाळ करत नाही म्हणून अनेकदा घरात भांडण होतात. मात्र हरियाणातील एका गावाने एक अनोखं अभियान सुरु केलं आहे. त्यामुळे घरातील ही भांडणे मिटून सासू-सासऱ्यांचा सांभाळ करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन मिळत आहे.
3 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने सुरु केलेल्या या उपक्रमाचं कौतुक अनेक जण करत आहेत. या उपक्रमातंर्गत सासू-सासऱ्याची सेवा करणाऱ्या महिलेला दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी रोख रक्कम 5 हजार 100 रुपये देऊन सन्मानित केलं जातं. या उपक्रमाची सुरूवात यंदाच्या वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 50 वर्षीय पुष्पा सैनी यांनी अंथरुणाला खिळलेल्या सासूची अनेक वर्ष सेवा केल्याबद्दल रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे. गावच्या सरपंच कमलेश रानी यांनी सांगितले की, हा सन्मान महिलांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आपल्या सासू सासऱ्यांची देखभाल करण्यास प्रेरित व्हावा म्हणून दिला जातो.
दरम्यान या उपक्रमात विशेषत: महिलांना फोकस करण्यात आलं आहे. हिसार जिल्ह्यातील जग्गा बर्रां गावातील पंचायतीने सुरु केलेल्या या उपक्रमात महिलांसाठी हा सन्मान ठेवण्यात आला आहे. पुरूषांसाठी या उपक्रमात स्थान देण्यात आलं नाही. हरियाणातील माजी सिंचन आणि ऊर्जा मंत्री अटर सिंह सैनी या गावातील आहेत.