आपल्याकडे १९५४ च्या ‘ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट’नुसार, डॉक्टरांना कोणत्याही माध्यमात जाहिराती करण्यावर बंदी आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने वैद्यकीय व्यवसायासाठी घालून दिलेल्या आचारसंहितेनुसार डॉक्टर कोणत्याही प्रकारची आश्वासने किंवा गॅरंटेड ट्रीटमेंटच्या जाहिराती देऊ शकत नाहीत. तसे आढळल्यास त्या डॉक्टरवर कारवाई केली जाते, प्रसंगी वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रद्द होऊ शकतो.
- पण पूर्वी अशी बंधने नव्हती आणि म्हणूनच त्या काळात वृत्तपत्रांमध्ये, तसेच रस्त्यावरच्या पोस्टर्स आणि लोकांमध्ये वाटल्या जाणाऱ्या हँडबिल्समध्ये डॉक्टर्स सर्रास आपली जाहिरात करीत असत. आपण कोणकोणत्या रोगांवर उपचार करू शकतो याचे तपशीलवार वर्णन त्यात असे.
सोबतची जाहिरात आहे १७३० च्या आसपासची. ‘द क्राफ्ट्समन’ या नावाचे एक ब्रिटिश वृत्तपत्र १७२६ ते १७५२ या काळात ब्रिटनमधले प्रमुख वृत्तपत्र म्हणून ओळखले जाई. कुणा रिचर्ड रॉक नावाच्या वैद्यक व्यावसायिकाची ही जाहिरात आहे. यातले इंग्रजी अठराव्या शतकातले असल्याने त्यातील स्पेलिंग्ज आणि अक्षरांची वळणे कदाचित सहजपणाने वाचता येणार नाहीत.
लंडनच्या ब्लॅक फ्रायर्स लेनवरच्या ॲपोथेकेरीज हॉलजवळ या रॉकचा दवाखाना होता असे या जाहिरातीवरून दिसते. “ज्याच्याकडे विविध लक्षणे असलेले ‘फ्रेंच रोग’ बरे करण्याची सुरक्षित आणि जलद पद्धत आहे’’, असा स्वतःचा उल्लेख हा रिचर्ड रॉक करतो. मग त्याने वेगवेगळ्या रोगांची आणि लक्षणांची एक भली मोठी यादीच दिलेली आहे. डोके, खांदे, हात, पाय, पाठ अशा अनेक प्रकारच्या दुखण्यावर तो इलाज करतो.
या यादीत अल्सर, मुख, घसा तसेच अगदी गुप्त भागावरच्या गाठी, अल्सर्सचादेखील समावेश केलेला आहे. कुष्ठरोग यासारख्या दुर्धर रोगांवरदेखील त्याच्याकडे उपचार उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे असाध्य रोग बरे करण्याचे वचनच त्याने देवाच्या साक्षीने दिले आहे. सकाळी सातपासून थेट रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णांना आपली सेवा उपलब्ध असल्याचे आणि इंग्लंडमध्ये कोणत्याही ठिकाणी आपण औषधी पाठवण्यास तयार असल्याचेही तो सांगतो आहे. जवळपास तीनशे वर्षांपूर्वीचे डॉक्टर्स कशा जाहिराती करीत असत याचे मनोरंजक दर्शन आपल्याला या जाहिरातीतून होते हे नक्की.
दिलीप फडके, विपणन शास्त्राचे अभ्यासक,pdilip_nsk@yahoo.com