ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 6 - 'भगवान देता है तो छप्पर फाडके' याचा अनुभव दुबईत राहणाऱ्या एका भारतीयास आला आहे. गेल्या 9 वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या श्रीराज कृष्णन कोप्पोरेम्बिल याला तब्बल 13 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. मुळचा केरळमधील असलेल्या श्रीराज कृष्णन याने अबू धाबीमधील बिग तिकीट ड्रॉच्या रविवारी रात्री जाहीर झालेल्या निकालात तब्बल 12 कोटी 71लाख 70000 हजार रुपयांचे बक्षीस जिंकलेआहे.
अनपेक्षित रित्या लागलेल्या लॉटरीमुळे कृष्णन खूश झाला आहे. तो म्हणतो. "जेव्हा मला लॉटरी जिंकल्याचा फोन आला तेव्हा एक मिनिटभर नेमके काय झाले आहे हेच मला समजले नाही, मी लॉटरी जिंकली आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता." नियमितपणे लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्या कृष्णनला याआधी कधीही लॉटरीचे तिकीट जिंकता आले नव्हते. त्यामुळे यानंतर लॉटरीचे तिकीट खरेदी करायचे नाही असे त्याने ठरवले होते, पण शेवटच्या प्रयत्नातच त्याला बंपर लॉटरी लागली.
सध्या एक लाख रुपये मासिक उत्पन्नावर काम करणाऱ्या कृष्णनला लॉटरीचे पैसे मिळाल्यानंतर भारताती घराच्या कर्जाची परतफेड करायची आहे. तसेच लॉटरी लागल्यानंतरही संयुक्त अरब अमिरातीतच काम करत राहणार असल्याचे कृष्णन आणि त्याच्या पत्नीने सांगितले.