आपण कितीही माेठं झालो तरी आपल्या शाळेच्या आठवणी आपल्या कायम स्मरणात असतात. त्या आपल्या सगळ्यांत जवळच्याही असतात. शाळकरी वयात झालेली दोस्तीही अधिक गहिरी आणि बऱ्याचदा आयुष्यभर टिकणारी असते. ही दोस्ती, हा याराना प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. जी गोष्ट शाळकरी दोस्तांची, तीच शाळेची आणि शाळेतल्या शिक्षकांचीही. या काळात घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यावर परिणाम करणारी असते. शाळेने, शाळेतल्या शिक्षकांनी जे संस्कार तुमच्यावर केलेले असतात, तेही कधीच न पुसले जाणारे असतात. त्यामुळेच नंतरच्या आयुष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तीही आपल्या कॉलेजच्या, विद्यापीठातील प्राध्यापकांपेक्षा आपल्या शाळेतल्या शिक्षकांविषयी जास्त आपुलकीनं बोलताना आढळतात. अलीकडच्या काळात तर आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी अनेकजण वीस-वीस, पंचवीस-पंचवीस वर्षांनी पुन्हा शाळेत जमतात. आपल्या त्यावेळच्या सवंगड्यांना भेटतात, आपल्या शिक्षकांविषयीही अतीव कृतज्ञता व्यक्त करतात.
बहुतेकांना याच शाळेनं आणि याच शिक्षकांनी ‘घडवलेलं’ असतं. या आठवणी जर चांगल्या असतील तर ठीक; पण या वयात जर शाळेचा आणि शाळेच्या शिक्षकांचा कटू अनुभव त्यांनी घेतला असेल, तर तेही त्यांच्या मनावर कायमचं कोरलं जातं. असाच एक अनुभव तुर्कीचा प्रसिद्ध अभिनेता कागलर एर्तुग्रुल यानं आपल्या शाळकरी वयात घेतला होता. त्याच्या दुर्दैवानं त्याचा हा अनुभव चांगला नव्हता. कागलर म्हणतो, माझ्या उमलत्या वयात शाळेनं माझं बालपण मारून टाकलं. माझी बालसुलभ उत्सुकता दाबून टाकली. माझ्यातलं बाल्य फुलवण्याऐवजी त्यांनी ते कोमेजून आणि आक्रसून टाकलं. शाळेतले शिक्षक अकारण रागवत, राग-राग करत. त्यांना एकच गोष्ट माहीत होती, मुलांचं काही चुकलं किंवा ते चुकताहेत असं त्यांना वाटलं की, मुलांना ढोलासारखं बडवायचं. हातावर, पाठीवर वळ येईपर्यंत त्यांना छड्या मारायच्या आणि रडवायचं. त्यावेळी माझ्या शरीर-मनावर उमटलेले ते व्रण आजही ताजे आहेत. मोठ्या उत्साहानं आणि अनेक स्वप्न मनाशी बांधून मी शाळेत प्रवेश घेतला होता; पण तिथे भलतंच घडलं. शाळेतले दिवस आपल्या आयुष्यात कधीच आले नसते, तर किती बरं झालं असतं, असंच आजही मला वाटतं!
कागलरच्या मनात शाळेविषयी इतका कटुता भरलेली आहे. हा इतिहास विसरण्यासाठी मग कागलरनं काय करावं? बालपणी ज्या शाळेत तो शिकला होता, ती अख्खी शाळाच मग त्यानं विकत घेतली आणि या शाळेची दु:खद आठवण कधीही नको आणि या शाळेत कधीच, कोणत्याच मुलानं प्रवेश घेऊ नये म्हणून ही शाळाच त्यानं बुलडोझरनं उद्ध्वस्त करून टाकली. शाळेचा असा ‘बदला’ घेतल्यानंतर याच शाळेच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यासमोर उभं राहून त्यानं फोटाे, व्हिडीओही काढले आणि लिहिलं, ‘..अखेर शाळेचा मी असा बदला घेतला!’
कागलरच्या या कृतीची सध्या अख्ख्या जगभरात चर्चा सुरू आहे. कागलरनं केलेली कृती योग्य की अयोग्य, यावरून सोशल मीडियावर चर्चेचे आणि वादविवादाचे रण उठले आहे. कागलरच्या बाजूनं आणि कागलरच्या विरुद्ध असे परस्परविरोधी चक्क दोन गटच सोशल मीडियावर तयार झाले आहेत आणि आता त्यांच्यातच जुंपली आहे. काही जणांचं म्हणणं आहे, कागलरनं केलं ते अगदी बरोबर आहे, अशा शाळा जमीनदोस्तच झाल्या पाहिजेत आणि अशा शाळेतल्या शिक्षकांनाही शिकवण्याची संधी कधीच मिळायला नको. त्याच वेळी काही जणांचं म्हणणं आहे, कागलरनं जी कृती केली तरी अतिशय अयोग्य आणि चुकीची आहे. शाळेतला प्रत्येकच शिक्षक मारकुटा असेलच असं नाही. शाळेतल्या काही चांगल्या गोष्टीही असतील आणि त्याचाही सकारात्मक परिणाम कागलरच्या आयुष्यावर उमटलाच असेल. शिवाय आपल्या शाळेविषयी जे मत कागलरचं आहे, तेच मत शाळेत शिकलेल्या प्रत्येकाचंच असेल असं अजिबात नाही. ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायानं अख्ख्या शाळेलाच त्यानं बदनाम केलं आहे.
आमचीही शाळा विकत घेतोस का?कागलरनं आपल्या शाळेची इमारत उद्ध्वस्त केल्यानंतर त्या मातीच्या ढिगाऱ्यावर उभं राहून फोटो काढतानाच खाली लिहिलं आहे, ज्या शाळेच्या आठवणी इतक्या खतरनाक असतील, ती शाळा अशीच मातीत गाडली गेली पाहिजे. ती मी कधीच पुन्हा उभी राहू देणार नाही! काही सोशल मीडिया युजर्सनी कागलरचं अभिनंदन करताना आपल्याही ‘मारकुट्या’ शाळेचं नाव आणि पत्ता दिला असून, याही शाळा तुला विकत घेता येतात का पाहा, अशी विनंती कागलरला केली आहे.