जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत. यातील काही नोकऱ्या तर अशा असतात ज्यांबाबत आपण कधी ऐकलेलंही नसतं. काही नोकऱ्या करणाऱ्या लोकांना इतका पगार मिळतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. महत्वाची बाब म्हणजे या नोकऱ्यांमध्ये ना जास्त अंग मेहनत करावी लागते ना कामाचं जास्त टेंशन असतं. घरात काम करणाऱ्या लोकांना किती पगार मिळत असेल याचा जर विचार केला तर सामान्यपणे जास्तीत जास्त महिन्याला ५० हजार, ६० हजार किंवा फार फार तर १ लाख मिळत असेल असं कुणाला वाटेल. पण जगात एक असंही ठिकाण आहे जिथे घरकाम करणाऱ्या लोकांना सव्वा कोटी रूपये पगार मिळतो. इतकंच नाही तर दरवर्षी त्यांच्या पगारात मोठी वाढही होते. इतका पगार असूनही इथे काम करणारे लोक सापडत नाही.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याच्या वेस्ट पाम बीच आणि बोका रॅटन नावाच्या ठिकाणांवर घरकाम करणाऱ्या लोकांना इतका पगार मिळतो. इथे ही कामे करणाऱ्या लोकांना दरवर्षी १५०,००० डॉलर पर्यंत पगार मिळतो. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम सव्वा कोटींपेक्षा जास्त होते. केवळ इतकंच नाही तर या लोकांना जर ओव्हरटाइम केला त्याचे पैसेही वेगळे मिळतात. सोबतच हेल्ध इन्शुरन्स आणि वेगवेगळ्या सुविधाही मिळतात. पण तरीही इथे काम करण्यासाठी नोकर मिळत नाहीत.
अमेरिकेच्या जनगणना ब्यूरोनुसार, वेस्ट पाम बीच आणि बोका रॅटनमध्ये अब्जाधीश लोकांची घरे आहेत. इथे बऱ्याच श्रीमंत लोकांनी मोठाले बंगले घेतले आहेत. याच कारणाने गेल्या दहा वर्षात येथील लोकसंख्या १३ टक्क्यांनी वाढली आहे. या भागात नोकरांना खूप डिमांड आहे. येथील घरांमध्ये काम करणाऱ्या लोकांना २०२० मध्ये जवळपास पगार तासाला २५ डॉलर इतका होता. जो आता वाढून ४५ ते ५० डॉलर प्रति तास झाला आहे.
घरकाम करणारे लोक पुरवणारी एजन्सी द वेलिंगटनच्या संस्थापक एप्रिल बेरूबे म्हणाल्या की, गेल्या ३० वर्षापासून मी येथील घरांमध्ये घरकाम करणारे लोक पुरवत आहे. पण जेवढी डिमांड आता आली आहे तेवढी आधी नव्हती. श्रीमंत लोक नोकरांना गलेलठ्ठ पगार देण्यास तयार आहेत. ही कामे करणाऱ्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ आहे. पण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. घरकाम करणारे लोकच मिळत नाहीये.
फोर्ब्सनुसार, गेल्यावर्षी पाम बीच फ्लोरिडामधील १०वं सगळ्यात श्रीमंत शहर होतं. इथे राहणाऱ्या लोकांचं सरासरी मासिक उत्पन्न ३३२,७६४ डॉलर म्हणजे जवळपास २.७७ कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. इथे बनलेल्या घरांची व्हॅल्यू १२ कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. इथे बीचवर अनेक बोट्स उभ्या असतात. महागड्या कार चालतात. डोनॉल्ड ट्रंप यांचं मार-ए-लागो रिसॉर्टही इथेच आहे.