बिहारमधील नालंदा जिल्ह्यामध्ये जगातील सर्वात महागड्या अशा मियाजाकी आंब्याची बाग आहे. ढकनिया गावातील शेतकरी सुरेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावरून माहिती मिळवत २०२१ मध्ये जपानमधून मियाजाकी प्रजातीच्या आंब्याची दोन झाडं मागवली होती. आता या झाडांना फळं लागण्यास सुरुवात झाली असून, मुकेश कुमार आणि रामकुमार या शेतकऱ्यांनी सांगितले की, मियाजाकी आंब्याच्या झाडांना पहिल्या वर्षी २१ आंबे लागले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की, जेव्हा कुणी त्यांच्या शेतामध्ये येईल. तेव्हा त्याला इथे अनेक प्रकारची झाडं दिसली पाहिजेत. सुमारे तीन एकरमध्ये पसरलेल्या या बगिचामध्ये त्यांनी आंब्याच्या मियाजाकी, ब्लॅक स्टोन, सीड लेस प्रजातींची रोपं लावली आहेत. त्याशिवाय. वेलची, साबुदाणा, तसेच सर्व प्रकारच्या मसाल्यांची झाडंही लावली आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे घराजवळच असलेल्या या बागेच्या सुरक्षेसाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि कुत्र्यांना तैनात केले आहे.
मुकेश आणि रामकुमार यांनी सांगितले की, भारतामध्ये मियाजाकी आंब्याची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याची किंमत सुमारे २ लाख रुपये किलो एवढी प्रचंड आहे. मियाजाकी ही आंब्याची सर्वात महागडी प्रजाती मानली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला ताइयो-नो-टोमागो किंवा एग्स ऑफ सनशाइन या नावाने विकले जाते.
सर्वसाधारणपणे आंबे हे हिरव्या आणि सोनेरी रंगाचे असतात. मात्र मियाजाकी आंबे गडद लाल रंगाचे असतात. त्यांचा आकार हा डायनासोरच्या अंड्यांसारखा असतो. या आंब्यांचं जपानमध्ये उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे त्यांचं नाव जपानमधील एक शहर मियाजाकीवरून ठेवण्यात आलं आहे.
एका मियाजाकी आंब्याचं वजन साधारण ३५० ग्रॅम एवढं असतं. त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट, बीटा-कॅरोटिन आणि फॉलिक अॅसिड यासारखे गुण असतात. या साखर १५ टक्के अधिक असते. मियाजाकी आंबा हा जपानमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या फळांपैकी एक आहे. निर्यात करण्यापूर्वी या आंब्यांचं कठोर परीक्षण केलं जातं. या आंब्याच्या प्रजातीचं उत्पादन जपानबरोबरच थायलंड, फिलिपिन्स आणि भारतातही घेतलं जातं.