- विवेक चांदूरकर
खामगाव : इंग्रजांविरोधात संपूर्ण देशभरात अनेक योद्धे लढले. इंग्रजांना रोखण्याकरिता अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. काहींचे नाव समोर आले तर काही योद्धे अपरिचितच राहले. अपरिचित राहिलेला एक उपेक्षित योद्धा म्हणजे गाविलगडचा किल्लेदार बेनिसिंग. १५ डिसेंबर रोजी गाविलगड येथे शौर्यदिन साजरा करून बेनिसिंगाच्या शौर्यशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला. चिखलदरा येथील गाविलगड हा विदर्भातील मोठ्या व महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. इमादशहाची राजधानी गाविलगड होता. इ. स. १४९० ते १५४७ पर्यंत इमादशाहीच्या काळात किल्ल्याला राजधानीचा मान मिळाला. मोगल, निजामांच्या ताब्यात हा किल्ला होता. विविध कालखंडात किल्ल्यात बांधकाम होत राहिले. भव्य परकोट, मजबूत बुरूज, अनेक दरवाजे व तोफा या किल्ल्यात आहे. नागपूरचे रघुजी राजे भोसले यांचा मुलगा मुधोजी याने इ.स. १७५२ मध्ये गाविलगड जिंकला. या किल्ल्यात नागपूरचे राजे भोसले आपला खजिना ठेवत होते. यावरून किल्ल्याची महती पटते. इ.स. १८०३ मध्ये किल्ल्यावर नागपूरचे राजे भोसले यांचे राज्य असताना इंग्रजांशी निकराची लढाई झाली होती. ती लढाई बेनिसिंंग यांनी प्राणपणाने लढली. ५ डिसेंबर रोजी इंग्रज अधिकारी वेलस्ली अचलपूरला आला. ७ डिसेंबरला तो देवगावला आला. तिथून त्याने किल्ला पाहल्यावर त्याच्या लक्षात आले की किल्ला जिंकणे अशक्य आहे. त्यांनी दुसरा इंग्रज अधिकारी स्टिव्हसनला अचलपूरच्या नवाबाची माणसे घेवून तीस मैलांचा चक्कर कापून किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी योग्य जागा निवडली. १२ डिसेंबर रोजी उत्तरेकडील दरवाजावर तोफांचा मारा करण्यात आला. १३ डिसेंबरला दोन्हीकडून तोफांचा मारा करण्यात आला. यावेळी आतून बेनिसिंगाचे मोजकेच सैनिक प्रत्यूत्तर देत होते. अखेरीस फितुरी झाली व इंग्रजांना किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी योग्य जागा दाखविण्यात आली. १४ डिसेंबर रोजी रात्री किल्ल्याच्या भिंतीला तोफांच्या गोळ्यांनी भगदाड पडले. इंग्रज अधिकारी केनी बरोबर एलफिस्टन १५ डिसेंबरला गेला होता. एलफिस्टनने लढाईची हकीकत लिहून ठेवली आहे. १५ डिसेंबरला इंग्रज सैन्य आतमध्ये शिरले व निकराची लढाई झाली. दोन्हीकडून बदुकांचा मारा सुरू झाला. सर्वत्र बदुकांचा आवाज घुमत होता. किल्ल्यातील दिल्ली दरवाजा अत्यंत बजबूत होता, बेनिसिंग येथे होता. इंग्रजांनी दरवाजावर हल्ला केला. दरवाजा उघडल्यावर भयंकर लढाई झाली. बेनिसिंगांने अनेक इंग्रज सैनिकांना ठार केले. अखेरीस बेनिसिंगाला हौतात्म्य प्राप्त झाले. ५ डिसेंबरपासून लढाईच्या मोर्चेबांणीला सुरूवात झाली. १५ डिसेंबरला लढाई संपली. इंग्रजांचे भरमसाठ सैन्य, त्यातच तोफांच्या माºयामुळे गाविलगडच्या भिंतींना भगदाड पडले. भिंती पडल्या मात्र बेनिसिंहाची हिंमत कायम होती. इंग्रज सैन्य किल्ल्यात शिरले तरीही गाविलगडचे रक्षण करण्याकरिता बेनिसिंग धिरोदत्त उभा होता. इंग्रज सैन्याच्या वारांनी जखमी झालेला बेनिसिंगला अखेर शौर्यत्व प्राप्त झाले व गाविलगड पारतंत्र्यात गेला. बेनिसिंगच्या मृत्यूनंतर स्त्रीयांनी जोहार केला. लढाई हरण्याची चिन्हे दिसताच बेनिसिंह व सैनिकांच्या कुटुंबातील स्त्रियांनी सरण रचले. बेनिसिंहाचा मृत्यू होताच स्त्रियांनी आगीत उडी घेवून जोहार केला. अन्य स्त्रियांना इंग्रज सैनिकांनी जोहार करण्यापासून वाचविले. मेवाडमध्ये युद्ध हरल्यानंतर राणी पदमावतीने जोहार केल्याचा इतिहास अनेकांना माहिती आहे. मात्र, गाविलगडमध्येही महिलांनी जोहार केला होता, याची माहिती अनेकांना नाही. बेनिसिंगाने दिलेला लढा, त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी केलेला जोहार काळाच्या ओघात लुप्त झाला. नव्या पिढीला याबाबत पुसटशीही कल्पनाही नाही. हा इतिहास जगासमोर यावा, याकरिता गत पाच वर्षांपासून स्वराज्य सेवा प्रतिष्ठान गाविलगड शौर्यदिन साजरा करीत आहे. यावर्षी गाविलगड किल्ल्यावर १४ व १५ डिसेंबर दोन दिवस स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्यावतीने गाविलगड शौर्य दिन तसेच वीर योद्धा बेनीसिंह कृतज्ञता व मातृवंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण विदर्भातील दूर्ग व इतिहासप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बारलिंगा गावातून दुर्गप्रेमींनी किल्ल्यावर चढाई केली. तसेच वºहाडातील विविध क्षेत्रात कार्य करणाºयांचा सत्कार करण्यात आला. दुर्ग प्रतिष्ठानचे अतूल गुरू, प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंग राजपूत, प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांच्या मार्गदर्शनात स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा काळे, सचिव प्रतीक पाथरे यांच्यासह मावळ्यांनी आयोजित केलेल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमामुळे गाविलगडच्या शौर्यशाली इतिहासाला उजाळा मिळाला. यावेळी बेनिसिंह यांचे वंशज दुर्गाचरणसिंह किल्लेदार, प्रदीपसिंह किल्लेदार यांचीही उपस्थिती होती. ज्या तलवारीने बेनिसिंह लढला ती तलवारही यावेळी आणण्यात आली होती. आगामी पिढीसाठी शौर्यशाली इतिहास प्रेरणादायी ठरणार आहे.