Hindu pilgrimage Pakistan : आपण अनेकप्रकारच्या यात्रांबाबत ऐकलं आहे. अमरनाथ यात्रा असो वा चारधाम यात्रा, धार्मिक आस्थेशी निगडीत या यात्रांचा अनुभव लोकांसाठी फारच वेगळा असतो. वेगवेगळ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा सोबत घेऊन लोक या यात्रा करत असतात. अशीच एका पाकिस्तानातील यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हिंगलाज माता मंदिर महत्त्व
पाकिस्तानातील हिंदु लोकांसाठी हिंगलाज मातेवर फार भक्ती आहे. असे म्हणतात की, विष्णुने जेव्हा माता सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले होते, त्यावेळी मातेचं शरीर ज्या ठिकाणी पडलं होतं तिथेच आज हिंगलाज मातेचं मंदिर आहे. एप्रिल महिन्यात साधू आणि योगी या मंदिरात जाण्यासाठी ४ दिवसांच्या यात्रेचे आयोजन करतात. या यात्रेत भारत आणि पाकिस्तानातील अनेक भाविक सहभागी होतात.
ज्वालामुखीचीही करतात पूजा
कराचीपासून ३३० किलोमीटर अंतरावर स्थित हिंजलाज मातेच्या मंदिराच्या मार्गात ३०० फूट उंच ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीला चंद्रगुप असं नाव आहे.
लोकांची अशी भावना आहे की, हा ज्वालामुखी इच्छा पूर्ण करतो. भाविक ज्वालामुखीमध्ये नारळ आणि फूल टाकतात. काही लोका ज्वालामुखीतून निघणारी ओली माती अंगावर लावतात, सोबत नेतात आणि त्याने छोटसं घरही बांधतात.
दूरदूरपर्यत एकही झाड दिसत नसलेल्या या ठिकाणाची यात्रा फारच कठीण आहे. वादळ, जोरदार वारा यामुळे मंदिरात पोहोचण्यात अनेक अडचणी येतात. आता या यात्रेची स्टोरी नॅशनल जिओग्राफीवर दाखवली जाणार आहे.