Bihar's Mari village: देशात सध्या लाउडस्पीकरवर अजान यावरून वाद सुरू आहे. अशात काही ठिकाणी सामाजिक एकोपा दाखवत मशीदींवरून भोंगे काढले गेले तर काही ठिकाणी मंदिरांवरूनही भोंगे काढले गेले. पण आज आम्ही तुम्हाला एका असा गावाबाबत सांगणार आहोत जिथे एकही मुस्लिम राहत नाही, पण तेथील मशिदीत अजान रोज होते. हे समजल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की, गावात एकही मुस्लिम व्यक्ती राहत नाही, पण येथील मशिदीत नियमानुसार पाच वेळा नमाज अदा केली जाते आणि अजानही होते. महत्वाची बाब म्हणजे हे सगळं हिंदू समाजाचे लोक करतात.
नालंदा जिल्ह्यातील बेन प्रखंडच्या माडी गावात केवळ हिंदू समाजाचे लोक राहतात. पण इथे एक मशिदही आहे. गावात राहणारे लोकच मशिदीची साफसफाई करतात. या गावात राहणारे लोक आनंदाच्या क्षणी मशिदीबाहेऱ डोकं टेकवून आशीर्वाद घेतात. गावातील लोकांनुसार, जे लोक असं करत नाहीत त्यांना नक्की अडचणीचा सामना करावा लागतो.
स्थानिक लोक सांगतात की, अनेक वर्षाआधी इथे मुस्लिम परिवार राहत होते. पण हळूहळू त्यांनी पलायन केलं आणि या गावात त्यांची मशीद तशीच राहिली. ही मशीद कधी-कुणी बांधली याबाबत काही पुरावे नाहीत. पण स्थानिक लोकांनी सांगितलं की, त्यांच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलं त्यानुसार ही मशीद २०० ते २५० वर्ष जुनी आहे. मशिदीसमोर एक मजारही आहे. जिथे लोक बसून गप्पा करतात.
अशात लोकांच्या मनात प्रश्न येतो की, गावात एकही मुस्लिम परिवार राहत नाही तरी अजान कोण देतं. स्थानिक लोकांनी यासाठी एक आयडिया शोधून काढली. त्यांनी अजानचे शब्द रेकॉर्ड करून एका पेन ड्राइव्हमध्ये ठेवले आहेत. अजानच्या वेळेवर ते हे रेकॉर्डिंग प्ले करतात.