Holi Weird Tradition : होळीचा सण हा रंगांचा उत्सव आहे. देशभरातील लोक या सणाला रंगात रंगलेले असतात. यावर्षी १८ मार्चला धुलिवंदन साजरा केला जाईल. देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे होळीच्या दिवशी काही विचित्र परंपरा पार पाडल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र परंपरेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ही परंपरा मध्य प्रदेशच्या एका भागात पार पाडली जाते.
मध्य प्रदेशच्या एका गावात भील आदिवासी होळीच्या दिवशी एका फारच रोमांचक परंपरा पार पाडतात. या गावात एक बाजार भरतो. ज्याला हाट असं म्हटलं जातं. या हाटमध्ये भील आदिवासी लोक होळीचं आवश्यक साहित्य खरेदी करतात. त्यासोबतच भील तरूण-तरूणी आपल्यासाठी नवं नातं शोधण्यासाठीही येतात.
परंपरेनुसार, हाटमध्ये गावातील सगळे लोक जमतात. त्यानंतर भील तरूण आपल्या हातांनी मांदल नावाचं एक वाद्य वाजवतात. यादरम्यान ते पारंपारिक नृत्यही करतात. नृत्य करता करता भील तरूण तिथे बसलेल्या तरूणींच्या गालावर गुलाल लावतात. भील तरूण ज्या तरूणीच्या गालावर गुलाल लावतात त्या तरूणीनेही त्या तरूणाला परत गुलाल लावला तर ही दोघांची नात्यासाठी सहमती समजली जाते.
तरूणींना पळवून घेऊन जातात तरूण
त्यानंतर तरूण त्या तरूणींना सर्वांसमोर पळवून नेतात. यात दोघांचीही सहमती असते आणि याला दोघांचं लग्न मानलं जातं. तरूणी त्यांची इच्छा असेल त्या तरूणासोबत पळून जाऊ शकतात. यात त्यांचे कुटुंबियही काही करू शकत नाहीत. दुसरीकडे जर तरूणाने लावल्यावर तरूणी त्याला गुलाल लावत नसेल तर तरूण दुसऱ्या एखाद्या तरूणीला गुलाला लावू शकतात. तिने पुन्हा गुलाल लावला तर त्यांचं नातं ठरतं. यात जोर जबरदस्ती काही केली जात नाही.