उद्या होळी आहे. महाराष्ट्रात होळीचा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. यामध्ये कोकणात होळी 'शिमगा' म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ब्रज होळीचा वेगळाचा थाट असतो. त्यामुळे वाराणसी आणि मथुरेमध्ये खास पाणी आणि फुलांची उधळण करून हा सण साजरा केला जातो. तर यामध्ये एकमेकांवर रंग टाकून होळी सेलिब्रेट करण्यासोबत महिला पुरूषांना लाठी किंवा कपड्यांपासून बनवलेल्या चाबूकाने एकमेकांना फटकवतात. मथुरा आणि वृंदावन मध्ये 15 दिवसांची होळी सेलिब्रेट केली जाते.
महत्त्व/आख्यायिका
लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.
होळी पूजेचे महत्व
घरात सुख – शांती, समृद्धि, संतान प्राप्ती यासारख्या अनेक गोष्टींसाठी महिला या दिवशी होळीची पूजा करतात. होळीच्या एक महिना अगोदर सर्व तयारी सुरू असते. अनेक सुकलेल्या झाडांची फांदी जमा केली जाते. आणि होळीच्या दिवशी त्यांना एकत्र करून पूजा करून पेटवले जाते.
होळी दहनाचा मुहूर्त
होळी ९ मार्चला म्हणजेच सोमवारी पहाटे ३ वाजून ३ मिनिटांनी सुरू होणार आहे. ते रात्री ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त २ तास २६ मिनिटं आहे. ९ मार्चला संध्याकाळी ६ वाजून २६ मिनिटं ते ८ वाजून ५२ मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असेल.