अजमेर: राजस्थानात एक अजब घटना घडली आहे. एक घोडी नवरदेवाला घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडला आहे. घोडी नवरदेवाला घेऊन पळाल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी कार आणि दुचाकीनं तिचा पाठलाग केला. जवळपास ४ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना घोडीला रोखण्यात यश मिळालं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.
अजमेरच्या नसीराबादमधील रामपुरामध्ये ३ दिवसांपूर्वी एक विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी पोहोचली. अनेक जण डीजेच्या तालावर थिरकत होते. मंगल कार्यालयात प्रवेश करण्याआधी काही विधी करायचे होते. ते करण्यासाठी नवरदेव घोडीवरच बसला होता. त्याचवेळी वऱ्हाडी मंडळींपैकी एकानं फटाके लावण्यास सुरुवात केली. फटाक्यांच्या आवाजानं घोडी बिथरली. तिनं नवरदेवासह तिथून धूम ठोकली.
घोडी नवरदेवाला घेऊन पळत असल्याचं पाहून वऱ्हाडी नाचायचे थांबले. त्यांनी कार आणि दुचाकी घेऊन घोडीचा पाठलाग सुरू केला. मंगल कार्यालयाच्या बाहेरून सुस्साट सुटलेली घोडी ४ किलोमीटर धावली आणि मग थांबली. यामुळे नवरदेवाची तब्येत बिघडली. सुदैवानं नवरदेव पूर्णपणे सुरक्षित आहे. डीजे संचालकानं या घटनेला दुजोरा दिला आहे.