Hotel Arbez: जगभरात असे अनेक हॉटेल्स आहेत, जे त्यांच्या सुंदरतेसाठी आणि लक्झरी सुविधांसाठी लोकप्रिय आहेत. पण कधी तुम्ही अशा हॉटेलबद्दल ऐकलं का की, जिथे बेडवर केवळ कूस बदलली तरी लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात. नाही ना? पण हे खरंय. असं एक हॉटेल असून या हॉटेलचं नाव अर्बेज हॉटेल आहे.
हे हॉटेल अर्बेज फ्रांको-सुइसे या नावानेही ओळखलं जातं. हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंडच्या सीमेवरील ला क्योर येथे आहे. हे हॉटेल दोन्ही देशांच्या सीमेच्या अगदी मधोमध आहे. त्यामुळे या हॉटेलचे दोन-दोन पत्ते आहेत.
या हॉटेलची खास बाब ही आहे की, फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंडची सीमा या हॉटेलच्या बरोबर मधून जाते. त्यामुळे या हॉटेलमध्ये जाताच लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात.
अर्बेज हॉटेलचं विभाजन दोन्ही देशांच्या सीमा लक्षात घेऊन करण्यात आलं होतं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, या हॉटेलमधली बार स्वित्झर्लॅंडमध्ये येतो तर बाथरूम फ्रान्समध्ये.
या हॉटेलच्या सर्वच खोल्यांना दोन भागात विभागलं गेलं आहे. खोल्यांमध्य डबल बेड असे लावले गेले आहे की, ते अर्धे फ्रान्समध्ये तर अर्धे स्वित्झर्लॅंडमध्ये आहेत. सोबतच बेडवर उशाही देशांच्या हिशेबानेच ठेवण्यात आल्या आहेत.
हे अनोखं हॉटेल ज्या ठिकाणावर उभारलं गेलं आहे ते ठिकाण १८६२ मध्ये अस्तित्वात आलं होतं. आधी इथे एक किराणा स्टोर होतं. नंतर १९२१ मध्ये जूल्स-जीन अर्बेजे नावाच्या व्यक्तीने हे दुकान खरेदी केलं आणि तिथे त्याने हॉटेल उभारलं. आता हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंडची ओळख झालं आहे.