पनामा सिटी : विटा, दगड आणि लाकडाची घरे तर तुम्ही अनेक पाहिली असतील; पण तुम्ही कधी प्लास्टिकच्या बाटल्यांनी बनलेली घरे पाहिली आहेत काय? होय. पनामा नावाच्या देशात लवकरच अशी घरे पाहावयास मिळतील. या देशात प्लास्टिकच्या बाटल्यांची घरे असलेले गाव वसविण्यात येत आहे. प्लास्टिकच्या बाटल्या पर्यावरणासाठी हानिकारक असतात. त्यांना कचरा समजून कुठेही फेकण्यात येते. त्यांचा पुनर्वापर करणेही अवघड असते. त्यांना जाळण्यात आले तर त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. या सर्व कारणांमुळे एका व्यक्तीने पर्यावरण वाचविण्याच्या उद्देशाने जुन्या बाटल्यांच्या पुनर्वापराचा हा अनोखा उपाय शोधला आहे. पनामात ८३ एकर क्षेत्रात प्लास्टिक बॉटल व्हिलेज नावाने साकारण्यात येत असलेला हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. येथील प्रत्येक घरासाठी १४ हजारांहून अधिक बाटल्या वापरल्या जाणार असून, अशी एकूण १२० घरे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सामाजिक केंद्र, मैदान आणि उद्यानही उभारण्यात येतील. आश्चर्याची बाब म्हणजे या घरांत तुम्हाला एसी (वातानुकूलन यंत्रणा) लावण्याची गरज पडणार नाही. उन्हाळ्यात इतर घरांच्या तापमानापेक्षा या घरांचे तापमान खूप कमी असते. घराच्या मजबुतीबाबतही तडजोड केली जात नसल्याचा निर्मात्यांचा दावा आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांची घरे
By admin | Published: March 20, 2017 12:41 AM