Chain Pulling In Train: हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, इमरजन्सीमध्ये रेल्वे थांबवण्यासाठी प्रत्येक कोचमध्ये एक चेन लावलेली असते. जी ओढल्यानंतर रेल्वे थांबते. ही एक एकप्रकारची इमरजन्सी ब्रेक असते. पण विनाकारण ही चेन खेचणंही महागात पडू शकतं. हे तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, चेन सिस्टीममध्ये असं काय असतं की, चेन खेचताच रेल्वे थांबते?
जर तुम्हाला याबाबत काहीच माहीत नसेल तर याबाबत आज आम्ही सांगणार आहोत की, चेन खेचल्यानंतर रेल्वे कशी थांबते आणि चेन खेचल्यावर पोलिसांना कसं समजतं की, रेल्वेच्या कोणत्या डब्यातून चेन खेचण्यात आली आहे.
आधी समजून घेऊ रेल्वेची ब्रेक सिस्टम
सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की, रेल्वेमध्ये ब्रेक कसे लागतात. रेल्वेचा ब्रेक नेहमीच लागलेला असतो. जेव्हा रेल्वे चालवायची असते तेव्हा ब्रेक सोडला जातो. ब्रेक सोडल्यानंतरच रेल्वे पुढे जाते. लोको पायलटला जेव्हा रेल्वे पुढे न्यायची असते तेव्हा ते एअर प्रेशरच्या माध्यमातून ब्रेकला टायरपासून वेगळं करतात. तसेच जेव्हा रेल्वे थांबवायची असते तेव्हा एअर देणं बंद केलं जातं.
चेन खेचल्यावर रेल्वे कशी थांबते?
रेल्वेच्या डब्यात असलेल्या अलार्म चेनचा संबंध ब्रेक पाइपसोबत असतो आणि जेव्हा ती खेचली जाते तेव्हा ब्रेक पाइपमधून एअरचं प्रेशर बाहेर निघतं. अशात रेल्वेला ब्रेक लागणं सुरू होतं. ब्रेक लागल्यामुळे ब्रेक सिस्टीममध्ये हवेचं प्रेशर अचानक कमी होऊ लागतं. लोको पायलटला याचा संकेत सिग्नल आणि हूटिंग सिग्नल मिळतो. ज्याद्वारे त्याला समजतं की, एकतर रेल्वेची चेन खेचण्यात आली आहे किंवा रेल्वेच्या ब्रेक सिस्टीममध्ये काहीतरी गडबड आहे. ज्यानंतर योग्य कारणाची तपासणी केली जाते.
पोलिसांना कसं समजतं?
चेन कुणी खेचली हे जाणून घेण्यासाठी एका जुन्या ट्रिकचा वापर केला जातो. रेल्वेच्या ज्या बोगीमधून चेन खेचली जाते. तिथे जोरात एअर प्रेशर लीक झाल्याचा आवाज येतो. या आवाजाच्या माध्यमातून रेल्वेचे पोलीस त्या बोगीपर्यंत पोहोचतात. त्यानंतर इतर प्रवाशांच्या माध्यमातून चेन खेचणाऱ्यापर्यंत. तसं हे ब्रेक सिस्टीमवरही अवलंबून असतं. व्हॅक्यूम ब्रेक चेन खेचल्यानंतर डब्याच्या वरच्या कोपऱ्यात एक व्हॉल्व फिरतो, जो बघूनही याची माहिती मिळवता येते.