ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं बाईकप्रेम तसं जगजाहीर आहे. अगदी जुन्या मॉडेलपासून ते आत्ताच्या लेटेस्ट बाईक्सपर्यंत सर्व गाड्या धोनीकडे आहेत. धोनी चित्रपटामधूनही त्यांचं हे बाईकप्रेम दाखवण्यात आलं होतं. चित्रपटातील एक सीन आठवत असेल तर धोनीच्या बाईक्स दाखवण्यात आल्या होत्या. आता त्या मोजायलाही जमलं नसतं एवढ्या बाईक होत्या. धोनीकडे किती बाईक्स आहेत हे अनेकांना कदाचित माहित नसेल, मात्र रविंद्र जाडेजाला हे नक्की माहित आहे. रविंद्र जाडेजाने धोनीच्या बाईक्सबद्दल खुलासा केला आहे.
आणखी वाचा
धोनीला महागड्या गाड्या आणि बाईक्सची प्रचंड आवड आहे. त्याचं हे प्रेम अनेकदा त्याने जाहीरही केलं आहे. आपल्या यशस्वी कारकिर्दीसाठी धोनीला श्रेय देणा-या रविंद्र जाडेजाने धोनीच्या गॅरेजमध्ये नेमक्या किती बाईक्स आहेत याचा खुलासा केला आहे.
जाडेजाकडेदेखील हायाबुसा बाईक आहे. तो स्वत:देखील बाईक्सचा चाहता आहे. मात्र आपलं हे वेड धोनीच्या पुढे काहीच नाही असंही तो सांगतो. जेव्हा जाडेजाला बाईक्ससंबंधी कधी धोनीचा सल्ला घेतला का ? असं विचारण्यात आलं, तेव्हा जाडेजाने हायाबुसाबद्दल सांगितलं. "हायाबुसा चांगली बाईक आहे. मात्र ती चालवण्याआधी आपल्याला कमरेचा व्यायाम करण्याची गरज असते. कारण ही बाईक चालवताना पुढे वाकून राहावं लागतं", असं जाडेजाने सांगितलं.
जाडेजाने यावेळी आपला मित्र महेंद्रसिंग धोनीकडे नेमक्या किती बाईक्स आहेत हेदेखील सांगितलं आहे. आपल्याला जेव्हा हा आकडा कळला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसल्याचंही त्याने सांगितलं. "त्याच्याकडे खूप सा-या बाईक्स आहेत. इतक्या की स्वत: धोनीलाही आकडा माहित नाही. मी एकदा त्याला तुझ्याकडे किती बाईक्स आहेत विचारलं होतं. यावर धोनीने माझ्याकडे 43-44 बाईक्स असतील असं सांगितलं होतं. यातील अर्ध्याहून जास्त बाईक्स तर त्याने चालवल्यादेखील नाहीत". अशी माहिती जाडेजाने दिली आहे.
यावेळी जाडेजाने सांगितलं की, "जेव्हा धोनी तिन्ही फॉरमॅटमधील क्रिकेट खेळायचा, तेव्हा बाईक चालवण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसायचा. पण आता जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमधून राजीनामा दिला आहे, तेव्हापासून त्याला बाईक चालवायला मिळते".