सध्या बेकायदेशीर घटना रोखण्यासाठी आणि समाजाला योग्य न्याय देण्यासाठी न्याय व्यवस्था अधिक चांगली करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक असाच प्रयत्न काही दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. याला विज्ञानाचा चमत्कारही म्हटलं जाऊ शकतं. आता रोबोट समाजातील न्याय व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी काम करेल. असाच एक रोबोकॉप(रोबोट पोलीस) अमेरिकेच्या रस्त्यांवर तैनात केला जाणार आहे. या रोबोटला एचपी रोबोकॉप हे नाव देण्यात आलं आहे. अंतराळ कॅप्सूल आकाराचा हा रोबोट पूर्णपणे स्वयंचलित असेल आणि रस्त्यांवर नजर ठेवेल.
या रोबोकॉपची खास बाब ही आहे की पेट्रोलिंग करतेवेळी ३६० डिग्री वर लक्ष ठेवू शकेल. पेट्रोलिंगदरम्यान हा रोबोट रस्ते, आजूबाजूचे पार्क आणि इमारतींमध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. तसेच काही घडत असेल तर गुन्हेगारांची माहिती थेट पोलीस मुख्यालयात पाठवेल. अशात पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचेल.
मीडिया रिपोर्टनुसार, या रोबोकॉपला सर्वातआधी हंटिग्टन पार्कच्या रस्त्यावर तैनात केलं जाणार आहे. या ठिकाणाची लोकसंख्या ५० हजार आहे. रोबोकॉपचा हा प्रयोग जर यशस्वी ठरला तर हा रोबोट लॉस एंजलिस आणि कॅलिफोर्नियासोबत संपूर्ण अमेरिकेत तैनात केले जातील.
दरम्यान, पोलीस या रोबोकॉपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. कोणत्याही संवेदनशील स्थितीत पोलिसांची टीम वेळ न घालवता घटनास्थळी पोहोचू शकतील. असेही सांगितले जात आहे की, या रोबोकॉपचं स्वत:चं ट्विटर अकाऊंट असेल.
या कॉपच्या छातीवर एक टच-स्क्रीन लावण्यात आलं आहे. ज्यावर लोक त्यांची तक्रार सहजपणे नोंदवू शकतात. तसेच हा रोबोट स्वत:ला स्थितीचं गांभीर्य समजून वेळीच कारवाई करेल अशाप्रकारे तयार करण्यात आलं आहे. तसेच या रोबोटच्या मदतीने लोक आधीच्या तक्रारींची माहितीही घेऊ शकता. कॅलिफोर्नियाच्या मेअर करीना मॅकिनास म्हणाल्या की, 'या इनोव्हेशनने सुरक्षा आणखी मजबूत होईल. आपण कशाचीही भीती न बाळगता कामे करू शकतो'.
दरम्यान अशाप्रकारचा एक रोबोट केरळ राज्यात सेवा देत आहे. केरळ पोलिसांच्या मुख्यालयात या रोबोटला लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आलं आहे. या मुख्यालयात हा रोबोट सध्या माहिती देण्याचं काम करत आहे. तसेच इथे येणाऱ्या लोकांच्या तक्रारी हा रोबोट नोंदवून घेतो.