सिरसा : ‘मंगला गं मंगला, तुझ्यासाठी चंद्रावर बांधीन गं बंगला,’ असे एक मराठी लोकप्रिय चित्रपटगीत आहे. आता हे गाणे असले तरी ते प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. काही पती लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला कार, बंगला, दागिने आणि कपडे देतात. मात्र, हरियाणातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली. एवढेच नाही तर वाढदिवसाच्या दिवशी त्याची कागदपत्रेही पत्नीला भेट दिली.
हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील कृष्णकुमार यांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट केली आणि पत्नी सरिता यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. यापूर्वी हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीने चंद्रावर जमीन खरेदी केली होती. टोहानाच्या वरुण सैनी यांनी आपल्या मुलाला वाढदिवसानिमित्त ही भेट दिली होती. कृष्णकुमार यांना सरिता यांच्यासाठी काहीतरी खास करायचे होते. चंद्रावर जमीन का विकत घेऊ नये, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी न्यूयॉर्कमधील लुनार सोसायटी इंटरनॅशनल या फर्मशी संपर्क साधला.
दिवंगत सुशांतचीही चंद्रावर प्लॉट खरेदी
दिवंगत अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांना अंतराळ विज्ञानात प्रचंड रस होता. त्यांनी एका अमेरिकन फर्मकडून चंद्रावर प्लॉटही खरेदी केला होता. शाहरुख खानकडेही चंद्रावरील प्लॉट आहे. याशिवाय अनेक भारतीयांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
तिच्या माध्यमातून चंद्रावर जमीन खरेदी करण्यात आली. हे गिफ्ट मिळाल्यानंतर सरिताच्या चेहऱ्यावर खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. सरिता सांगते की, तिला अशी भेट मिळेल, अशी अपेक्षा कधीच नव्हती.
वेबसाइटचा दावा आहे की, अनेक देशांनी बाह्य अवकाशातील जमीन विकण्यासाठी अधिकृत केले आहे. आता पुढेमागे चंद्रावर जमिनीचा वाद निर्माण होऊन कोर्ट-कचेऱ्या कराव्या लागल्या तर चंद्र काही साक्षीला येणार नाही, हे निश्चित.