ऑनलाइन लोकमत -
बरेली, दि. ८ - एचआयव्ही झाला असल्याने पत्नीने आपल्या वडिलांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडीत व्यक्ती ट्रक ड्रायव्हर असून आपल्या पत्नीच्या घरी राहत होती. 2013 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. आपल्याला एचआयव्ही असल्याचं माहिती पडल्यानंतर पिडीत व्यक्तीने एआरटी सेंटरमध्ये काऊंसिलिंगला सुरुवात केली. काऊंसिलिंग संपल्यानंतर तो आपल्या पत्नीच्या घरी भोजीपुरा येथे राहायला गेला होता.
पिडीत व्यक्तीला एड्स झाल्याची माहिती होती, मात्र लोकांच्या भीतीने त्याने कोणालाही याबद्द्ल सांगितलं नव्हतं. त्याने स्थानिक एआरटी सेंटरमध्ये काऊंसिलिंग घेण्यास सुरुवात केली होती अशी माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. बुधवारी त्याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पत्नी आणि सासरा समाधानक उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. तसंच मृत्यूनंतर त्यांनी पोलिसांना न कळवता पिडीत व्यक्तींच्या घरच्यांना कळवून अंत्यसंस्काराची तयारीदेखील सुरु केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पिडीत व्यक्तींच्या कुटुंबियांना मृतदेहावर जखमा आढळल्यानंतर त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पिडीत व्यक्तीची पत्नी, सासरा आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एड्स रुग्णाला घरात ठेवणं कलंक त्यांना कलंक वाटत होतं आणि त्यामुळेच हत्या केली असावी असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अजून कोणाला अटक करण्यात आलेलं नाही.