Tomato News : सध्या टोमॅटोचे भाव काहीच्या काही वाढल्याने त्याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. बऱ्याच लोकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाले आहेत. अशात मध्य प्रदेशच्या शहडोलमधून टोमॅटोसंबंधी एक वेगळीच हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे पती-पत्नीमधील वाद टोमॅटोमुळे इतका वाढला की, पत्नी रागाच्या भरात घर सोडून आपल्या बहिणीकडे गेली. पीडित पतीच्या तक्रारीनंतर पोलीस दोघातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
टिफिन सेंटर चालवणाऱ्या संजीव वर्मन याने जेवण बनवताना भाजीमध्ये टोमॅटो टाकले. पण यामुळे त्याची पत्नी नाराज झाली आणि मुलीला घेऊन ती घर सोडून गेली. पतीने पत्नीला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. इतकंच नाही तर संजीवने टोमॅटो न खाण्याची शपथही घेतली. पण ती गेली.
ती घर सोडून गेल्यावर संजीवने तिला शोधण्यासाठी पोलिसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला पत्नी आरतीचा नंबर मागितल्यावर त्याने दिला. तेव्हा पोलिसांनी संपर्क केला तर आरतीने सांगितलं की, ती तिच्या बहिणीच्या घरी उमरियामध्ये आहे.
त्यानंतर पोलिसांनी संजीवचंही पत्नीसोबत बोलणं करून दिलं. पोलीस दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. संजीव एक छोटा ढाबा चालवतो आणि सोबतच लोकांना टिफिनही पुरवतो.
पोलिसांनी सांगितलं की, आरती वर्मनला संपर्क केला तर तिने सांगितलं की, संजीव तिच्यासोबत दारू पिऊन मारहाण करतो. यावरूनच ती नाराज आहे. याच कारणाने ती 4 वर्षाच्या मुलीला घेऊन बहिणीच्या घरी निघून गेली. तेच संजीव म्हणाला की, वादाचं खरं कारण टोमॅटोच आहे. संजीव आणि आरतीचं लग्न 8 वर्षाआधी झाल्याचं समजतं.